युवा बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी झेप घेतली आहे. लंडन ऑलिम्पिक कांस्यपदकविजेती सायना नेहवाल सातव्या स्थानी स्थिर आहे. नववे स्थान मिळवत सिंधूने क्रमवारीत सायनाच्या दिशेने वाटचाल केली. आगामी स्पर्धामध्ये दमदार प्रदर्शन केल्यास सिंधूला सायनाची बरोबरी करण्याची किंवा तिला मागे टाकून आगेकूच करण्याची संधी आहे.
१८ वर्षीय सिंधूने यंदा लखनौ येथे झालेल्या सय्यद मोदी ग्रां.प्रि. गोल्ड स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यानंतर अखिल भारतीय वरिष्ठ मानांकन स्पर्धेचे जेतेपद तिने पटकावले. सिंधू ५५,७५२ गुणांसह नवव्या स्थानी आहे. सायनापासून ती केवळ ३९२८ गुणांनी पिछाडीवर आहे. ४ ते ९ मार्च या कालावधीत होणाऱ्या अखिल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत सायना आणि सिंधू यांच्यात क्रमवारीतील स्थानासाठी जोरदार मुकाबला रंगण्याची शक्यता आहे.
पुरुषांमध्ये १८व्या स्थानी असलेला पारुपल्ली कश्यप सर्वोत्तम खेळाडू आहे. इराण येथील स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या सौरभ वर्माने नऊ स्थानांनी आगेकूच करत १८वे स्थान पटकावले आहे. महिला, मिश्र आणि पुरुष दुहेरीच्या क्रमवारीत अव्वल दहामध्ये एकाही भारतीय जोडीचा समावेश नाही.