इन्चॉन (कोरिया) : चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सुरुवातीच्या फेरीतच आव्हान संपुष्टात आल्यानंतर पी. व्ही. सिंधूच्या विश्वविजेतेपदाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. परंतु मंगळवारपासून सुरू होणाऱ्या कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या निमित्ताने तिला प्रतिष्ठेला साजेसे खेळण्याचे आव्हान समोर असेल.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद काबीज करण्याची किमया साधणाऱ्या ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूचे चीन खुल्या स्पर्धेच्या दुसऱ्याच फेरीत आव्हान संपुष्टात आले. थायलंडच्या पोर्नपावी चोच्यूवाँगने तिला नामोहरम केले. गेल्या आठवडय़ातील या अपयशातून सावरत २०१७ नंतर पुन्हा ही स्पर्धा जिंकण्याचा निर्धार सिंधूने केला आहे.

सलामीच्या सामन्यात अमेरिकेच्या बेवेन झँगशी तिची गाठ पडणार आहे. विश्वविजेतेपदाच्या वाटचालीत सिंधूने बेवेनला पराभूत केले होते. गतवर्षी इंडिया आणि डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धामध्येसुद्धा सिंधूने तिला नमवले होते.

यंदाच्या हंगामात पूर्वार्धात इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धा जिंकणाऱ्या लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालला अद्याप अपेक्षित सूर गवसलेला नाही. त्यामुळे मलेशिया, न्यूझीलंड, सदिरमन आणि चीन येथील बॅडमिंटन स्पर्धामध्ये ती अपयशी ठरली. कोरियाच्या किम गा ईऊनशी तिची पहिल्या फेरीत गाठ पडेल.

पुरुष एकेरीत बी. साईप्रणीत, पारुपल्ली कश्यप यांच्यावर भारताची भिस्त असेल. पुरुष दुहेरीत सात्त्विकसाईराज रनकीरेड्डी आणि चिराग शेट्टी तसेच मनू अत्री आणि बी. सुमीत रेड्डी या जोडय़ा खेळणार आहेत.