ओडेन्से (डेन्मार्क) : डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताच्या आव्हानाची धुरा ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांच्यावर असेल.

या स्पर्धेसाठी सिंधूला तृतीय मानांकन देण्यात आले असून, सायनाला मानांकन मिळालेले नाही. स्पर्धेच्या प्रारंभी सिंधूचा सामना अमेरिकेच्या बिवेन झ्ॉँग हिच्याशी तर सायनाचा सामना हाँगकाँगच्या चेऊंग नगानशी होणार आहे.

पुरुष एकेरीमध्ये भारताच्या किदम्बी श्रीकांत याला स्पर्धेसाठी सातवे मानांकन देण्यात आले आहे. श्रीकांतची लढत यजमान डेन्मार्कच्या हॅन्स क्रिस्टियान सोलबर्ग व्हिटिंगहसशी तर बी. साईप्रणीतचा सामना चीनच्या हुआंग युशिआंगशी होणार आहे, तर भारताच्या समीर वर्माला प्रारंभीच चीनच्या तृतीय मानांकीत शी युकीचा तर एच. एस. प्रणॉयला कोरियाच्या सोन वॅन हो याच्याशी मुकाबला करावा लागणार असल्याने त्यांच्यासाठी पहिलीच लढत अतिशय आव्हानात्मक ठरणार आहे. दुहेरीत भारताच्या मनू अत्री-बी. सुमीत रेड्डी जोडीला डेन्मार्कच्या किम अ‍ॅस्ट्रप आणि अँड्रेस स्कारूप रासमुसेन यांच्याशी झुंजावे लागणार आहे. अश्विनी आणि सात्त्विकसाईराज रँकीरेड्डी यांना कोरियाच्या सीओ सेऊंग जे आणि चाए युजुंग यांच्याशी मिश्र दुहेरीत तर पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांना अमेरिकेच्या एरियल ली आणि सिडनी ली यांच्याशी महिला दुहेरीत संघर्ष करावा लागणार आहे.