रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेती पी.व्ही.सिंधू हिने चायना सुपर सीरिज स्पर्धेच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. सिंधूने उपांत्यपूर्व सामन्यात जागतिक क्रमवारितील दहाव्या क्रमांकावर असणाऱ्या बिंगजियाओ हिला २२-२०,२१-१० असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. यापूर्वी सिंधू आणि बिंगजिओ यांच्यामध्ये सहावेळा सामने रंगले होते. ज्यामध्ये चार वेळा बिंगजियाओने सिंधूला पराभूत केले होते. तर सिंधूला फक्त दोन वेळा बाजी मारता आली होती. दोघींमध्ये रंगलेल्या आतापर्यंतच्या सामन्यात बिंगजिओचे वर्चस्व असल्यामुळे सिंधूला हा सामना जड जाईल, असे वाटले होते. पण सिंधूने चांगला  खेळ करत स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम ठेवली. बिंगजिओला तिसऱ्यांदा पराभूत करुन सिंधूने उपांत्य फेरी गाठली.

या स्पर्धेतील पहिल्या फेरीत सिंधूने शिआ सिन ली हिचा २१-१२, २१-१६ असा सरळ सेटमध्ये अवघ्या ३४ मिनिटांमध्ये पराभव केला होता. तर दुसऱ्या फेरीत सिंधूने अमेरिकेच्या बीवेन झॅन्गचा धुव्वा उडविला होता. रिओ ऑलिम्पिकच्या महिला एकेरीतील चायना ओपनमध्ये खेळून आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये पुनरागमन करण्याचा सायनाचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. त्यामुळे आता चायना ओपनमध्ये सिंधूच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

ऑलिम्पिक पदकानंतर तब्बल दोन महिने सिंधू सत्कार समारंभांमध्ये व्यस्त होती. पुनरागमनानंतर सिंधूला दोन स्पर्धांमध्ये झटपट गाशा गुंडाळावा लागला होता. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन पदके नावावर असणाऱ्या सिंधूला अद्यापही एकदाही सुपरसीरिज स्पर्धेच्या जेतेपदाची कमाई करता आलेली नाही. या स्पर्धेद्वारे सिंधूची ही इच्छा पूर्ण होऊ शकते.