लांबणीवर पडलेल्या टोक्यो ऑलिम्पिकचे येत्या उन्हाळ्यात आयोजन आम्ही करू, असा दावा जपानकडून केला जात आहे. मात्र १२ कोटी ७० लाख लोकसंख्येच्या या देशामधील नागरिकांच्या लसीकरणाबाबत अनिश्चितता असल्याने ऑलिम्पिकबाबतचे प्रश्नचिन्ह कायम आहे.

फेब्रुवारीच्या उत्तरार्धात जपानमधील कोविड-१९ लसीकरण प्रक्रियेला प्रारंभ होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. मात्र करोना लशीच्या संशोधनात जगात पिछाडीवर पडलेल्या जपानमधील नागरिकांचे जुलै महिन्याच्या आत लसीकरण होणे अवघड मानले जात आहे. त्यामुळे ऑलिम्पिकपुढील आव्हान अधिक गडद झाले आहे.

देशी लशीची प्रक्रिया प्राथमिक अवस्थेत असल्याने जपानची फायझर, अ‍ॅस्ट्राझेनेका आणि मॉडर्ना या परदेशी औषध कंपन्यांशी बोलणी सुरू आहेत. यापैकी फायझरशी करार होण्याची शक्यता असल्याचे संकेत आरोग्यमंत्र्यांनी दिले आहे.