थीम, झ्वेरेव्ह यांची उपांत्य फेरीत मजल

मेलबर्न : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या राफेल नदालला ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीमने बुधवारी पराभवाचा धक्का दिला. पाचव्या मानांकित थीमने तब्बल सव्वाचार तास आणि तब्बल तीन टायब्रेकपर्यंत रंगलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या या सामन्यात नदालला हरवत त्याचे २०वे ग्रँडस्लॅम पटकावण्याचे स्वप्न धुळीस मिळवले.

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत नदालने दोन वेळा थीमला हरवले होते. थीमने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बुधवारी त्या पराभवांची कसर भरून काढली. थीमने ही लढत ७-६ (७/३), ७-६ (७/४), ४-६, ७-६ (८/६) अशी जिंकत उपांत्य फेरीत स्थान मिळवले. नदालने आतापर्यंतच्या लढतींमध्ये थीमवर ९-४ असे वर्चस्व गाजवले आहे. त्याशिवाय नदालने ग्रँडस्लॅम स्पर्धाच्या याआधीच्या पाचही लढतींमध्ये थीमचे आव्हान मोडीत काढले होते.

पंचांच्या कामगिरीवर नदाल नाराज

उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अनेकदा प्रतिस्पध्र्याच्या बाजुने निकाल दिल्यामुळे स्पेनच्या राफेल नदालने पंच ऑरेली टॉर्टे हिच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. ‘‘खुर्चीवर बसलेली पंच सामन्याला दिशा देण्याचे काम करत असते. माझ्या विरोधात निकाल दिल्यानंतर ‘तुम्हाला चांगले टेनिस पाहायचे नाही का?’ असे मी त्यांना सांगितले. मी वेळेच्या नियमांचे उल्लंघन करत आहे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या निर्णयाबाबत मी नाराज नाही,’’ असे नदालने सांगितले.

मी प्रत्येक वेळी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा आणि संधीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न केला. खडतर क्षणी मी दोन टायब्रेक गमावले. तीन तास खेळ केल्यानंतर छोटय़ाशा चुकांमुळे दोन टायब्रेक गमावणे किती कठीण असते, याची मला कल्पना होती. प्रतिस्पर्धी चांगला खेळ करत असताना मी अनेक समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत होतो. राफेल नदाल

झ्वेरेव्ह पहिल्यांदाच उपांत्य फेरीत

जर्मनीचा युवा खेळाडू अलेक्झांडर झ्वेरेव्ह याने अनुभवी स्टॅनिस्लॉस वॉवरिंका याला पराभवाचा धक्का देत आपल्या कारकीर्दीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. सातव्या मानांकित झ्वेरेव्हने पहिला सेट गमावला असला तरी त्यानंतर मात्र जोरदार पुनरागमन करत त्याने पुढील तिन्ही सेट जिंकले. झ्वेरेव्हने २०१४ सालच्या विजेत्या वॉवरिंकाला २ तास १९ मिनिटे रंगलेल्या सामन्यात १-६, ६-३, ६-४, ६-२ असे पराभूत केले. उपांत्य फेरीत मात्र झ्वेरेव्हची गाठ राफेल नदालला हरवणाऱ्या डॉमिनिक थीम याच्याशी पडणार आहे.

मुगुरुझा, हॅलेप यांच्यात उपांत्य लढत

बिगरमानांकित गार्बिन मुगुरुझा हिने रशियाच्या ३०व्या मानांकित अ‍ॅनास्तेशिया पाव्हलूचेंकोव्हा हिचा पाडाव करत आपण लयीत आल्याचे दाखवून दिले आहे. गतजागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या स्पेनच्या मुगुरुझा हिने पाव्हलूचेंकोव्हाचा ७-५, ६-३ असा पाडाव केला. आता अंतिम फेरीत मुगुरुझासमोर दोन वेळा ग्रँडस्लॅम विजेत्या सिमोना हॅलेप हिचे आव्हान असणार आहे. त्याचबरोबर अव्वल मानांकित अ‍ॅशले बार्टी आणि अमेरिकेची १४वी मानांकित सोफिया केनिन यांच्यात गुरुवारी उपांत्य फेरीचा दुसरा सामना रंगणार आहे. सिमोना हॅलेप हिने आपल्या ताकदवान खेळाचे प्रदर्शन करत इस्टोनियाच्या अ‍ॅनेट कोंटाविट हिचा अवघ्या ५३ मिनिटांत ६-१, ६-१ असा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत थाटात धडक मारली आहे. चौथ्या मानांकित हॅलेपने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत एक सेट गमावला होता. आता गार्बिन मुगुरुझा हिचे आव्हान हॅलेप कसे परतवून लावते, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

काही वेळेला आपल्याकडून चांगली कामगिरी होत नाही, पण कडवी लढत देऊन आपण आगेकूच करत असतो. पहिल्या सेटमध्ये मला संघर्ष करावा लागला. आता ऑस्ट्रेलियन स्पर्धेची पहिली उपांत्य फेरी खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. अनेक वर्षांपासून सिमोना हॅलेप हिचा खेळ पाहत असून हा सामना माझ्यासाठी खडतर असणार आहे.

– गार्बिन मुगुरुझा