भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांना दुहेरी हितसंबंधांच्या आरोपांसदर्भात साक्ष देण्यासाठी २६ सप्टेंबरला मुंबईत सुनावणीसाठी हजर राहण्याची सूचना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) नीती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे आजीव सदस्य संजीव गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्ती जैन यांनी द्रविड यांना लिखित स्वरूपात आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले होते. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक असलेले द्रविड हे इंडिया सिमेंट कंपनीत उपाध्यक्षपदावर कार्यरत आहेत. चेन्नई सुपर किंग्ज हा इंडियन प्रीमियर लीगमधील संघ इंडिया सिमेंटच्याच मालकीचा असल्यामुळे द्रविड यांचे दुहेरी हितसंबंध असल्याचे गुप्ता यांनी नमूद केले आहेत. ‘बीसीसीआय’च्या घटनेनुसार कोणत्याही व्यक्तीला दोन पदे भूषवता येणार नाही.

मुंबईत २६ सप्टेंबरला होणाऱ्या सुनावणीत द्रविड यांना आपली बाजू मांडता येईल. ‘बीसीसीआय’चे कर्मचारी मयांक पारिख यांच्यावरही हितसंबंधांचे आरोप केले जात आहेत. त्यांचीही सुनावणी याच दिवशी आहे, असे जैन यांनी सांगितले.

लिखित जबाबात द्रविड यांनी म्हटले आहे की, ‘‘मी इंडिया सिमेंट कंपनीकडून बिनपगारी सुट्टी घेत भारतीय क्रिकेटसाठी कार्यरत आहे. याचप्रमाणे चेन्नई सुपर किंग्जशी आमचा कोणताही संबंध नाही.’’