भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून कार्यभार हाती घेण्याचा निर्णय माझी क्षमता आणि उपलब्ध वेळ यावर अवलंबून आहे, असे मत राहुल द्रविडने व्यक्त केले. ट्वेन्टी-२० विश्वचषकासह संघ संचालक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपला आहे. संघाचा पूर्णवेळ प्रशिक्षक म्हणून द्रविडचे नाव चर्चेत आहे. मात्र प्रशिक्षकपद स्वीकारण्यासंदर्भात द्रविडने ठोस उत्तर देण्याचे टाळले. द्रविड सध्या १९ वर्षांखालील युवा संघ तसेच भारतीय ‘अ’ संघाचा प्रशिक्षक आहे.
‘निवृत्ती स्वीकारल्यानंतर पूर्णवेळ प्रशिक्षकपद स्वीकारण्याचा निर्णय मी या व्यापक स्वरूपाच्या कामासाठी किती वेळ देऊ शकेन यावर अवलंबून आहे. हा निर्णय घेण्यासाठी वेळ लागेल. आता मी या जबाबदारीसाठी तयार आहे किंवा तयार नाही असे सांगता येणार नाही. प्रशिक्षकपद ही शिकण्याची प्रक्रिया आणि अनुभव आहे. प्रत्येक दिवशी आपल्या पोतडीत नव्या गोष्टींची भर पडते. सर्वसमावेशक विचार केल्यानंतरच प्रशिक्षक होण्यासंदर्भात निर्णय घेईन’, असे द्रविडने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘या कामाचे स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी किती ऊर्जा, वेळ द्यावा लागेल. ते शंभर टक्के देण्याची तयारी झाली आहे का याची चाचपणी करावी लागेल. प्रशिक्षकपदाच्या कारकीर्दीत फक्त विजय मिळवणे महत्त्वाचे नाही. अंगीभूत क्षमतेचा सर्वोत्तम उपयोग करत प्रदर्शन होणे अत्यावश्यक आहे. असे प्रदर्शन खेळाडूंकडून करवून घेण्यासाठी प्रशिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे. मला चांगला फलंदाज व्हायचे असेल तर त्यासाठी किती गोष्टींचा त्याग करावा लागतो, वेळ खर्च करावा लागतो याची मला जाणीव आहे. प्रशिक्षकपद त्याला अपवाद नाही’.
‘प्रशिक्षकपदाच्या भूमिकेत मी नवीन आहे. खेळाडू म्हणून वावरताना काही गोष्टींचा मी कधीच विचार केला नव्हता. कर्णधारपद भूषवताना रणनीती आखणे, डावपेच लढवणे या गोष्टी कराव्याच लागतात. स्वत:च्या कामगिरीबरोबरच संघाचा सदैव विचार करावा लागतो. काही वेळा हातून चुका घडतात आणि थोडय़ा कालावधीनंतर त्या लक्षात येतात. काय वेगळा विचार करता आला असता ते समजते’, असे द्रविडने सांगितले.
युवा संघाला मार्गदर्शन करण्याच्या अनुभवाविषयी द्रविड म्हणाला, ‘१९ वर्षांखालील विश्वचषकात ४६ षटके वेगवान गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून आमचा पराभव झाला. आशियाई उपखंडात खेळताना फिरकी हेच प्रमुख आक्रमण असेल असा विचार होता. त्यानुसार आम्ही अभ्यास केला. मात्र मध्यमगती गोलंदाजी प्रमुख अस्त्र असलेल्या संघाने आम्हाला नमवले. यातून खूप काही शिकण्यासारखे आहे.’

किमतीवरून खेळाडूंचे कौशल्य पाहणे अयोग्य
खेळाडूंना लिलावात लाभलेल्या बोलीवरून त्यांचे कौशल्य पाहणे चुकीचे आहे. प्रत्येक वेळी किमतीच्या आधारे त्यांची क्षमता व कौशल्य सिद्ध होत नसते, असे दिल्ली डेअरडेव्हिल्सचे ‘मेन्टॉर’ राहुल द्रविड यांनी येथे सांगितले. पवन नेगी याच्याकरिता दिल्ली संघाने साडेआठ कोटी रुपये मोजले आहेत. त्याबद्दल विचारले असता द्रविड यांनी सांगितले, आयपीएलसाठी खेळाडूंचे लिलाव होतात. त्याची प्रक्रिया मला माहीत आहे. एखाद्या खेळाडूला जी किंमत मिळते, ती किंमत त्याच्या खऱ्या कौशल्याचे प्रतीक नसते. अनेक वेळा लिलावातील बोली ठरविण्यावर कोणाचेही नियंत्रण नसते. एखाद्या खेळाडूला मोठी किंमत लाभली तर फ्रँचाईजीकडून या खेळाडूला खूप मोठे महत्त्व दिले जाते. काही वेळा त्याच्याच संघात या खेळाडूपेक्षाही अधिक चांगला व क्षमतावान खेळाडू असू शकतो. आयपीएल स्पर्धेचे स्वरूपच असे आहे की अनेक वेळा गुणवान खेळाडूंना त्यांच्या क्षमतेइतकी किंमत मिळत नाही. वेस्ट इंडिजच्या कालरेस ब्रेथवेटकरिता चार कोटी २० लाख रुपये मोजावे लागले. त्याबद्दल द्रविड म्हणाले, विश्वचषक ट्वेन्टी२० स्पर्धेपूर्वी हा लिलाव झाला होता. त्या वेळी त्याला देण्यात आलेली किंमत खूप मोठी वाटत होती. अर्थात, विश्वचषक स्पर्धेत तोच विडींजच्या विजेतेपदाचा शिल्पकार ठरला. कोणत्या खेळाडूकरिता किती बोली लावायची याकरिता फ्रँचाईजीकडून खूप मोठय़ा प्रमाणावर संशोधन व अभ्यास केला जात असतो. संघातील अंतिम अकरा खेळाडूंची निवड करणे आव्हानच असते. कारण संघात सात ते आठ आंतरराष्ट्रीय खेळाडू असतात व हे खेळाडू अव्वल दर्जाचे असतात. साहजिकच त्यांच्यापैकी कोणाला विश्रांती द्यायची व कोणाला खेळवायचे हे काम जिकिरीचे असते.