इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध होणाऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यासाठी भारताच्या ‘अ’ संघामध्ये सलामीवीर लोकेश राहुलला स्थान देण्यात आले आहे. केरळच्या वायनाड येथे ७ ते १० फेब्रुवारीदरम्यान हा सामना होणार आहे.

दूरचित्रवाणीवरील एका कार्यक्रमात हार्दिक पंडय़ाने महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले, तेव्हा त्याच्यासमवेत राहुलदेखील होता. पण त्या वक्तव्यात त्याचा सहभाग नव्हता. मात्र त्या प्रकरणावरून दोघांची चौकशी सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर राहुलला अनधिकृत कसोटीत स्थान दिले जाणार का, याबाबत साशंकता होती. पण चौकशी पूर्ण होईपर्यंत पंडय़ाला भारतीय संघात स्थान मिळाल्याने राहुलचा मार्ग मोकळा झाला.

अंकित बावणेच्या नेतृत्वाखाली भारत अ संघ इंग्लंड लायन्स संघाशी भिडणार आहे. भारताचा जलदगती गोलंदाज वरुण आरोन यालाही संघात स्थान देण्यात आले आहे.

अ संघात आवेश खान, शार्दूल ठाकूर आणि नवदीप सैनी अशी जलदगती गोलंदाजी खेळवण्यात येणार आहे. त्याशिवाय मुंबईचा फलंदाज सिद्धेश लाड आणि मयांक मरकडे, अष्टपैलू जलाज सक्सेना, प्रीयांक पांचाळ, अभिमन्यू ईश्वरन, रिकी भुई यांचादेखील संघात समावेश करण्यात आला आहे.

भारत अ संघ : अंकित बावणे (कर्णधार), लोकेश राहुल, एआर. ईश्वरन, प्रीयांक पांचाळ, रिकी भुई, सिद्धेश लाड, के. एस. भारत, जलाज सक्सेना, शादाब नदीम, मयांक मरकडे, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, आवेश खान, वरुण आरोन.