बीसीसीआयकडून कारवाईनंतर उत्तर प्रदेश क्रिकेटची चौकशी सुरू
उत्तर प्रदेश रणजी क्रिकेट संघात खेळाडूंना स्थान मिळवून देण्यासाठी लाच मागितल्याच्या आरोपाखाली भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) गुरुवारी इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) अध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या खाजगी कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले.
एका हिंदी वृत्तवाहिनीवर शुक्ला यांचे कार्यकारी साहाय्यक अक्रम सैफी व क्रिकेटपटू राहुल शर्मा यांच्यातील दूरध्वनीद्वारे झालेले संभाषण दाखवण्यात आले. यामध्ये सैफी राहुलला संघात स्थान मिळवून देण्याचे आश्वासन देतानाच त्याच्याकडे पैशांची मागणी करताना आढळले. शुक्ला हे सध्या उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेचे (यूपीसीए) संचालक आहेत.
‘‘प्रशासकीय समितीचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी. के. खन्ना यांच्यातील संभाषणाच्या अनुषंगाने व बीसीसीआयच्या नियम व अटींमधील नियम क्रमांक ३२च्या अंतर्गत आम्ही अक्रम सैफीकडे त्याच्याविरोधात लादण्यात आलेल्या आरोपासंदर्भात स्पष्टीकरण मागितले आहे,’’ असे ‘बीसीसीआय’ने म्हटले आहे.
नियम क्रमांक ३२च्या अंतर्गत गैरव्यवहाराची कोणतीही तक्रार सी. के. खन्ना यांनी पुढील ४८ तासांत नेमणूक केलेल्या आयुक्ताने हाताळणे गरजेचे आहे. त्या आयुक्ताने पुढील १५ दिवसांत त्याचे निष्कर्ष सादर करणे बंधनकारक आहे, जे नंतर बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीकडे पाठवण्यात येईल.
मंडळाच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाचे प्रमुख अजित सिंग यांनी त्या वृत्तवाहिनीकडे ध्वनिफितीची मागणी केली आहे. संशयित आरोपी क्रिकेटपटू राहुलने एकाही सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केलेले नाही. सैफीने संघात निवड करून देण्याच्या नावाखाली राहुलकडून अनेक अनधिकृत कामे करवून घेतली. त्याशिवाय राहुलने सैफीवर वयाचे बनावट प्रमाणपत्र बनवल्याप्रकरणीही आरोप केला आहे. मात्र सैफीने हे सर्व आरोप नाकारले आहेत तर, शुक्ला यांनी यासंबंधी अद्यापी मौन बाळगले आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने या घटनेबाबत आश्चर्य प्रकट केले आहे. तो म्हणाला, ‘‘उत्तर प्रदेश क्रिकेटमध्ये चाललेला भ्रष्टाचार पाहून मला धक्का बसला आहे. युवा खेळाडूंच्या आयुष्याला यामुळे चांगले वळण मिळत नाही. राजीव शुक्ला आणि त्यांचे कर्मचारी योग्य ती तपासणी करून खेळाडूंना न्याय मिळवून देतील व उत्तर प्रदेश क्रिकेटची इभ्रत जपतील, अशी मला आशा आहे. त्याचप्रमाणे शोषित सर्व खेळाडूंच्या पाठीशीही मी ठामपणे उभा आहे.’’ कैफच्याच नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशने २००५-०६मध्ये एकमेव रणजी विजेतेपद मिळवले होते.