विदर्भचा वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानी याने रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत आज इतिहास नोंदवला. दिल्लीच्या संघाविरुद्ध बळींची हॅटट्रिक साधत रजनीश रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सलग तीन बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. तब्बल ४५ वर्षांनंतर त्याने ही कामगिरी नोंदवली आहे. रजनीशच्या या धमाकेदार कामगिरीमुळे (६/५९) दिल्लीच्या संघाला पहिल्या डावात २९५ धावांवर रोखण्यात विदर्भच्या संघाला यश मिळाले आहे.

कोलकाता येथे कर्नाटकविरोधात १६२ धावा देत १२ बळी घेणाऱ्या रजनीशने सलग तीन चेंडूत ३ फलंदाजांचा त्रिफळा उडला. यामध्ये विकास मिश्रा (७), नवदीप सैनी (०) आणि शोरे (०) यांचे बळी घेत त्याने आपली हॅटट्रिक पूर्ण केली. रणजी क्रिकेटच्या अंतिम सामन्यात हॅटट्रिक साधणारा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी तामिळनाडूच्या के. बी. कल्याणसुंदरम यांनी १९७२-७३ मध्ये मुंबईविरोधात चेन्नईमध्ये बळींची हॅटट्रिक साधली होती.

रजनीशने आपल्या २३ व्या षटकातील शेवटच्या २ चेंडूत आणि २४ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूत बळी घेत ही हॅटट्रिकची किमया साधली. त्याने आपल्या शेवटच्या ७ चेंडूत दिल्लीचे ४ बळी घेतले. ज्यामुळे दिल्लीचा संपूर्ण संघ २९७ धावा करुन बाद झाला. दिल्लीकडून ध्रुव शोरे याने सर्वाधिक १४५ धावा केल्या. त्यानंतर हिंमत सिंह याने ६६ धावांचे योगदान दिले.

या स्पर्धेतील उल्लेखनीय बाब ही आहे की, विदर्भचा संघ या वर्षी पहिल्यांदाच रणजीच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. यापूर्वी विदर्भचा संघ दोन वेळेस उपांत्य फेरीत पोहोचला होता. २००२-०३ आणि २०११-१२ मध्ये हा संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला होता. मात्र, सर्धा जिंकू शकला नव्हता. यापूर्वी विदर्भचा संघ दोन वेळा उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाला होता. पहिल्यांदा १९७०-७१ मध्ये त्यानंतर १९९५-९६ मध्ये विदर्भचा संघ रणजीच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला होता.