महाराष्ट्र संघाविरुद्ध रणजी क्रिकेट लढतीत फॉलोऑनची नामुष्की ओढवलेल्या विदर्भ संघाने दुसऱ्या डावात मात्र चिवट झुंज देत डावाचा पराभव टाळला. दुसऱ्या डावात बिनबाद २६वरून पुढे खेळणाऱ्या विदर्भने तिसऱ्या दिवसअखेर ६ बाद २७४ अशी मजल मारली.
रवी जंगीडने ६६, तर शलभ श्रीवास्तवने ५४ धावांची संयमी खेळी केली. श्रीवास्तव-जंगीड जोडीने पाचव्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. उर्वश पटेलने ४४, तर फैझ फझलने ४१ धावा करत या दोघांना चांगली साथ दिली. महाराष्ट्रातर्फे डॉमिनिक जोसेफने सर्वाधिक ३ बळी घेतले. विदर्भच्या संघाकडे ४६ धावांची आघाडी आहे. महाराष्ट्राने पहिल्या डावात ३४२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना विदर्भचा पहिला डाव ११४ धावांतच आटोपला होता. डॉमिनिक जोसेफने १९ धावांत ५ बळी घेतले होते. मात्र दुसऱ्या डावात खेळपट्टीवर नांगर टाकून फलंदाजी करत विदर्भने डावाचा पराभव टाळला.
सामन्याच्या अंतिम दिवशी विदर्भचा दुसरा डाव झटपट गुंडाळून झटपट लक्ष्य गाठत विजय मिळवण्यासाठी महाराष्ट्राचा संघ उत्सुक आहे.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र (पहिला डाव) : सर्वबाद ३४२ (अंकित बावणे १००; रवीकुमार ठाकूर ३/९४) विदर्भ (पहिला डाव) : ११४ आणि (दुसरा डाव) : ६ बाद २७४ (रवी जंगीड ६६, शलभ श्रीवास्तव ५४; डॉमिनिक जोसेफ ३/४०)