सिद्धेश लाडच्या दमदार खेळीमुळे रणजी करंडक स्पर्धेत मुंबईने बडोद्याविरूद्धचा पाचशेवा ऐतिहासिक सामना अनिर्णित राखला आणि पराभव टाळला.  सिद्धेश लाडने २३८ चेंडूत ७१ धावांची नाबाद खेळी केली. या दरम्यान सिद्धेशने ७ जबरदस्त चौकारही लगावले. त्याच्या या खेळीमुळे पाचशेव्या रणजी सामन्यात डावाच्या पराभवाची नामुष्की टळली. पहिल्या डावात मुंबईचा संघ १७१ धावांमध्येच तंबूत परतला. त्यानंतर बडोदा संघाने ९ बाद ५७५ धावांवर डाव घोषित केला. मुंबईला पराभव टाळण्यासाठी धावपट्टीवर टिकून राहणे आवश्यक होते. सिद्धेश लाड चार तास खेळपट्टीवर होता त्यामुळे मुंबईला ऐतिहासिक सामन्यातली पराभवाची नामुष्की टाळता आली.

पाचशेव्या रणजी सामन्यात मुंबईला हरवण्याचे बडोद्याचे स्वप्न भंगले. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना सुरु होता. सिद्धेश लाडने सूर्यकुमार यादवसोबत सहाव्या विकेटसाठी ७९ धावा केल्या. मात्र दीपक हुड्डा याने सूर्यकुमारला बाद केले. यानंतर सिद्धेश लाड आणि अभिषेक नायर या दोघांनीही बचावात्मक खेळ सुरु केला. सिद्धेशने २३८ चेंडू खेळत ७१ धावा केल्या तर अभिषेक नायरने १०८ चेंडूत अवघ्या ८ धावा केल्या. मुंबईने अखेरच्या दिवशी ७ बाद २६० धावा केल्या. ग्रुप सी मधला मुंबईचा हा तिसरा ड्रॉ आहे. बडोदा संघाला या सामन्यात सात गुण मिळाले आहेत. ११ गुणांसह मुंबई तिसऱ्या स्थानावर आहे.