दुसऱ्या दिवसअखेर यजमान मुंबईची पहिल्या डावात २ बाद २० धावा अशी अवस्था

यष्टिरक्षक फलंदाज उपेंद्र यादवने (नाबाद २०३ धावा) साकारलेल्या दिमाखदार द्विशतकाच्या बळावर उत्तर प्रदेशने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत ‘ब’ गटातील मुंबईविरुद्धच्या लढतीत ६२५ धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर मुंबईची २ बाद २० धावा अशी अवस्था करून उत्तर प्रदेशने आघाडीच्या दिशेने वाटचाल केली आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात रविवारच्या ४ बाद २८१ धावांवरून पुढे खेळताना उत्तर प्रदेशने शतकवीर अक्षदीप नाथला (११५) दिवसाच्या पहिल्याच षटकात गमावले. परंतु सातव्या क्रमांकावर आलेल्या उपेंद्रने २७ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद २०३ धावांची खेळी साकारल्यामुळे उत्तर प्रदेशने ८ बाद ६२५ धावांवर डाव घोषित केला.

प्रत्युत्तरात मुंबईने सलामीवीर जय बिश्त (३) आणि शशांक अत्तार्डेला (९) लवकर गमावले.  राजपूतने या दोघांनाही पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. दिवसअखेर भूपेन लालवाणी ६, तर हार्दिक तामोरे १ धावेवर खेळत असून मुंबईचा संघ अद्यापही ६०५ धावांनी पिछाडीवर आहे.

बंगालच्या मनोज तिवारीचे त्रिशतक

कल्याणी (पश्चिम बंगाल) : बंगालचा अनुभवी फलंदाज मनोज तिवारीने सोमवारी हैदराबादविरुद्धच्या लढतीत रणजी कारकीर्दीतील पहिलेवहिले त्रिशतक झळकावले. १२ एकदिवसीय आणि ३ ट्वेन्टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या ३४ वर्षीय मनोजने ३० चौकार आणि पाच षटकारांच्या साहाय्याने ४१४ चेंडूंत नाबाद ३१३ धावा केल्या. बंगालकडून त्रिशतक झळकावणारा तो दुसरा फलंदाज ठरला.

संक्षिप्त धावफलक

  • उत्तर प्रदेश (पहिला डाव) : १५९.३ षटकांत ८ बाद ६२५ डाव घोषित (उपेंद्र यादव नाबाद २०३, अक्षदीप नाथ ११५; रॉयस्टन डायस ३/१०३) ’ मुंबई (पहिला डाव) : ७ षटकांत २ बाद २० (शशांक अत्तार्डे ९, भूपेन लालवाणी खेळत आहे ६; अंकित राजपूत २/१५)