भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कार्यकारिणी समितीने भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू रवी शास्त्री यांना पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी विश्वचषक स्पध्रेपर्यंत संचालकपदावर कायम ठेवले आहे. याचप्रमाणे बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा २० नोव्हेंबरला घेण्याचे निश्चित केले आहे.
पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेपर्यंत प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांची सेवा घेण्यात येणार आहे. तसेच संजय बांगर, भरत अरुण आणि आर. श्रीधर यांना साहाय्यक प्रशिक्षक म्हणून विश्वचषकापर्यंत करारबद्ध करण्यात आले आहे.
शास्त्री मायदेशात होणारी वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका, ऑस्ट्रेलियात होणारी कसोटी मालिका व तिरंगी स्पर्धा आणि यानंतर १४ फेब्रुवारीला सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पध्रेत भारतीय संघाला मार्गदर्शन करतील.
बीसीसीआयने क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक ट्रॅव्हर पेन्नी आणि गोलंदाजीचे प्रशिक्षक जो डाऊस यांना करार संपेपर्यंत बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत कार्यरत राहण्याची विनंती केली आहे; परंतु त्यांना हे मान्य नसल्यास त्यांनी राजीनामा देण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे.
बीसीसीआयचे पायउतार झालेले अध्यक्ष एन. श्रीनिवासन तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून उपस्थिती होते.