दुबई : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ हा १६ सदस्यांचा अपेक्षित होता. मात्र १५ खेळाडूंचे निर्बंध असल्याने ज्यांची संधी हुकली आहे, त्यांनी निराश होऊ नये, असे मत भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे.

इंग्लंडमध्ये ३० मेपासून प्रारंभ होणाऱ्या विश्वचषकासाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली. या संघात ऋषभ पंत तसेच अंबाती रायुडू यांचा समावेश नसल्यामुळे क्रिकेट क्षेत्रातील अनेकांनी नाराजी प्रकट केली आहे. या पाश्र्वभूमीवर शास्त्री म्हणाले, ‘‘केवळ १५ खेळाडूच निवडायचे, हे एकदा निश्चित केल्यानंतर कुणातरी एक-दोन खेळाडूंची संधी हुकणारच होती. मी निवड समितीच्या प्रक्रियेत सहभागी नव्हतो. माझी काही मते असतील तर ती मी कर्णधारापर्यंत पोहोचवत असतो.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘मला विचारले असते, तर १६ सदस्यांच्या संघाचीच निवड करायला हवी होती. विश्वचषकासारख्या मोठय़ा स्पर्धेसाठी १६ खेळाडूच हवेत, असे मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला कळवले होते. परंतु १५ खेळाडूच निवडण्याचे निर्बंध घालण्यात आल्यामुळेच सारी समस्या निर्माण झाली. मात्र ज्यांची संधी हुकली आहे, त्यांनी निराश न होता त्यांचा दमदार खेळ कायम ठेवावा. यदाकदाचित कुणाला दुखापत झाली तर अशा वेळी संधी हुकलेल्यांपैकीच कुणाला तरी बोलावणे येऊ शकते. त्यामुळे खचून जाऊ नका.’’

विजय शंकरला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देण्याबाबत निर्माण झालेल्या वादाबाबत शास्त्री यांनी अत्यंत मोघम उत्तर दिले. ‘‘भारतीय संघातील चौथ्या क्रमांकाबाबत आपण खूप लवचीक धोरण ठेवणार आहोत. प्रारंभीचे तीन फलंदाज निश्चित असल्याने त्यानंतरच्या क्रमांकांवर लवचीकता चालू शकेल,’’ असेही शास्त्री म्हणाले. यंदाच्या विश्वचषकात इंग्लंडचा संघ सर्वाधिक प्रमुख दावेदार राहणार असल्याचेही शास्त्रींनी  यावेळी सांगितले. ‘‘ भारतीय संघ हा केवळ कर्णधार विराट कोहलीच्या फलंदाजीवरच अवलंबून नसून संघातील अन्य खेळाडूदेखील योगदान देत असल्यामुळेच पाच वर्षांपासून भारत सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत इंग्लंडच्या संघाची कामगिरी ही सर्वाधिक सातत्यपूर्ण आहे. त्यांच्या फलंदाजी आणि गोलंदाजीत खूप वैविध्य असल्याने ते यंदाच्या विश्वचषकाचे दावेदार आहेत,’’ असेही शास्त्री यांनी सांगितले.