बॉल टॅम्परिंग अर्थात चेंडू कुरतडल्याप्रकरणी आता भारतीय खेळाडूंच्या प्रतिक्रियाही हळूहळू समोर येऊ लागल्या आहेत. गौतम गंभीर आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांना पाठिंबा देणारे ट्विट्स केले आहेत. जग तुम्हाला रडवू इच्छिते, तुम्ही रडलात की त्यांचे समाधान होते. स्मिथ आणि वॉर्नर यांच्याबाबत मला सहानुभूती वाटते आहे. देव त्यांना या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी बळ देवो अशा आशयाचे ट्विट अश्विनने केले आहे.

तर गौतम गंभीरनेही होय स्मिथची चूक झाली पण त्याच्यासोबत माझी सहानुभूती आहे. त्याने जे केले ते संघाला यश मिळवून देण्यासाठी केले. त्याने पत्करलेल्या मार्गाचे समर्थन होऊ शकत नाही. पण म्हणून आपण सगळे किंवा जगभरातील क्रिकेट प्रेमींनी या दोघांना भ्रष्ट खेळाडू असे लेबल लावता कामा नये अशा आशयाचे ट्विट गौतम गंभीरने केले आहे.

दरम्यान गुरुवारी चेंडू कुरतडल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथनं पत्रकार परिषदेत सगळ्या क्रीडाप्रेमींची माफी मागितली. बोलताना भावना अनावर झाल्याने डोळ्यातून अनेकवेळा त्याच्या पाणी आलं आणि आपण भयंकर मोठी चूक केल्याचं त्यानं मान्य केलं. कर्णधार म्हणून आपण चुकीचा निर्णय घेतल्याचं तो म्हणाला. माझं क्रिकेटवर प्रेम असून यातून बाहेर पडू असा विश्वास त्यानं व्यक्त केला.

स्मिथ आणि वॉर्नर या दोन्ही खेळाडूंवर १२ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. चेंडू कुरतडल्याचे प्रकरण या खेळाडूंच्या अंगाशी आले आहे. मात्र त्यांची चूक झाली असली तरीही त्यांचे करिअर कुरतडले जाऊ नये ही इच्छा सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा यांच्या पाठोपाठ आता गौतम गंभीर आणि आर. अश्विन यांनीही व्यक्त केली आहे.