सध्याच्या घडीला अश्विन जगातील सर्वोत्त्कृष्ट फिरकी गोलंदाज असल्याचे मत श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथ्थया मुरलीधरनने व्यक्त केले. अश्विनची कामगिरी कमालीची आहे. त्याची आकडेवारीमुळे त्याच्या कोणी जवळपासही दिसत नसल्याचे तो म्हणाला. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विनने ५४ डावांमध्ये ३०० बळींचा टप्पा गाठला होता. त्याने डेनिस लिलींचा विक्रम मोडीत काढत क्रिकेटच्या मैदानात नवा इतिहास रचला. याआधी एकाही खेळाडूने इतक्या कमी डावांमध्ये ३०० बळी घेतलेले नाहीत.

विक्रमवीर अश्विनला शुभेच्छा देताना मुरलीधरन म्हणाला की, अश्विन अवघ्या ३१ ते ३२ वर्षांचा आहे. तो आणखी चार ते पाच वर्षे खेळू शकतो. यासाठी त्याला चांगल्या कामगिरीसोबतच दुखापतीपासून दूर राहण्याचे आव्हान असेल. वयाच्या पस्तीशीनंतर मैदानावरील कामगिरीत सातत्य राखणे खूप कठीण असते, असेही तो यावेळी म्हणाला.  भारतीय संघाच्या कामगिरीचे देखील त्याने कौतुक केले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखीलील संघ चांगली कामगिरी करत आहे. श्रीलंका आणि भारत यांच्यात खूप क्रिकेट झाले. यात नेहमीच विराटने बाजी मारली. भारतीय संघ खरचं खूप चांगले खेळत आहे. त्यांना मी अधिक गुण देईन, असे तो म्हणाला. श्रीलंका संघातील खेळाडूंची कामगिरी निराशजनक आहे. युवा खेळाडूंच्या अपयशामुळे संघाची डोकेदुखी वाढत आहे. मागील काही दिवसांपासून संघाची कामगिरी खूपच खालावली आहे. ही चिंताजनक बाब असल्याचे देखील मुरलीधरन म्हणाला.

डेनिस लिलींचा विक्रम मोडीत काढून अश्विन मुरलीधरनच्या ४००, ५००, ६००, ७०० आणि ८०० या विक्रमाच्या दिशेने वाटचाल करणे मोठे आव्हान असणार आहे. मुरलीधनने १३३ कसोटीत ८०० बळी मिळवण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केलाय. खुद्द मुरलीधरनने केलेल्या कौतुकानंतर अश्विन या दिग्गजाच्या विक्रमाच्या जवळ पोहोचणार की, विश्वविक्रमाला गवसणी घालण्यात यशस्वी होणार हे येणारा काळच ठरवेल.