ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात चांगला मारा केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या कांगारुंना पहिल्या सत्राअखेरीस ३ बाद ६५ वर रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. पहिल्या सत्राअखेरीस आश्विनने २ तर बुमराहने एक बळी घेतला. या सत्रात भारतीय कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या रविंद्र जाडेजाने पुन्हा एकदा आपली चमक दाखवली.

जसप्रीत बुमराहने सलामीवीर जो बर्न्सला स्वस्तात माघारी धाडत कांगारुंना पहिला धक्का दिला. यानंतर वेड आणि लाबुशेन यांनी छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. ऑस्ट्रेलियाची ही जमलेली जोडी फोडण्यासाठी कर्णधार रहाणेने आश्विनला चेंडू दिला. आश्विनच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात मॅथ्यू वेड फसला. मात्र चेंडू हवेत असताना जाडेजा आणि गिल यांच्यात कॅच घेण्यावरुन मोठा संभ्रम निर्माण झाला. जाडेजा कॅच घेत असतानाही गिल त्याच्या दिशेने धावत आल्यामुळे दोन्ही खेळाडूंमध्ये टक्कर झाली. तरीही जाडेजाने कॅच पकडत भारताला दुसरं यश मिळवून दिलं. पाहा हा व्हिडीओ…

सुरुवातीच्या सत्रातच तीन बिनीचे शिलेदार माघारी परतल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ बॅकफूटवर गेला. अखेरीस ट्रॅविस हेड आणि लाबुशेन यांनी उरलेलं सत्र खेळून काढत संघाची अधिक पडझड रोखली. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाही लाबुशेन-हेड जोडीने भारतीय गोलंदाजांना नेटाने सामना करत संघाला शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला.