आयपीएल २०२१ च्या स्पर्धेतील सलग दूसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने जिंकला आहे. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला तर दूसऱ्या सामन्यात सनराइजर्स हैदराबादला पराभूत केलं आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात बंगळुरुनं प्रथम फलंदाजी करत ८ गडी गमवून १४९ धावा उभारल्या. मात्र मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीमुळे हैदराबादला हे लक्ष्य गाठता आलं नाही. हैदराबादचा संघ ९ गडी गमवून १४३ धावा करू शकला. या सामन्यात केलेल्या गोलंदाजीचं सिराजनं गुपित उघड केलं आहे.

‘या सामन्यात फक्त १५० धावांचं लक्ष्य होतं. त्यामुळे पहिल्या षटकापासून हैदराबादवर दबाव कायम ठेवणं गरजेचं होतं. यासाठी मी सुरुवातीपासूनच चेंडू स्विंग करत होतो. जेव्हा माझ्या हाती नवा चेंडू येतो. तेव्हा माझा हाच प्रयत्न असतो. कारण चेंडू स्विंग झाला तर विकेट्स मिळतील आणि आमच्या संघावरील दबाव कमी होईल. त्या पद्धतीने मी स्विंग करत होतो आणि विकेट्स मिळाल्या’, असं मोहम्मद सिराजनं सांगितलं.

…अखेर दिल्ली कॅपिटल्सनं पृथ्वी शॉचा हट्ट पुरवला

मोहम्मद सिराजने ४ षटकांमध्ये २५ धावा देत २ गडी बाद केले. त्यात त्याने एक षटक निर्धाव टाकलं. त्यामुळे प्रतिस्पर्धी हैदराबादवर दबाव कायम राहिला. मोहम्मद सिराजनं पॉवर प्लेच्या पहिल्या ३ षटकात एक गडी बाद करत १४ धावा दिल्या. यावेळी सिराजची गोलंदाजी खेळताना हैदराबादच्या फलंदाजांना अडचणी येत होत्या. त्यामुळे नेमकं काय सुरु आहे, हे कळेपर्यंत सामना हातून गेला होता.

Video: चिडलेल्या कोहलीने बॅटने उडवली खुर्ची, IPL च्या आचारसंहितेचा भंग; मॅच रेफ्रींनी फटकारलं

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने हैदराबादविरुद्धच्या सामना ६ धावांनी जिंकला. या विजयासह आयपीएल गुणतालिकेत बंगळुरुचा संघ अव्वल स्थानी पोहोचला आहे. बंगळुरुचा पुढचा सामना कोलकातासोबत १८ एप्रिलला चेन्नईत दुपारी ३.३० वाजता आहे.