दुसऱ्या कसोटीत वृद्धिमान साहाला दुखापत झाली आणि बराच काळ प्रतीक्षा करणाऱ्या यष्टीरक्षक-फलंदाज नमन ओझाला भारतीय संघाची दारे खुली झाली. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत खेळण्याची संधी मिळाल्यास चांगली कामगिरी करून दाखवण्याचे दडपण असेल, असे ओझाने सांगितले. ‘‘बऱ्याच कालावधीनंतर ही संधी चालून आल्यामुळे थोडेसे दडपण असणे स्वाभाविक आहे, परंतु त्याचा फारसा विचार करीत नाही. मी फक्त  माझ्या खेळाचा आनंद लुटण्याचे ठरवले आहे,’’ असे ओझाने सांगितले.
‘‘मागील महिन्यात ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध मी खेळलो होतो. कसोटीमध्ये खेळण्यासाठी सज्ज झालो आहे. चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे,’’ असे तो या वेळी म्हणाला. २०१०मध्ये ओझा श्रीलंकेविरुद्ध एक एकदिवसीय सामना आणि झिम्बाब्वेविरुद्ध दोन ट्वेन्टी-२० सामने खेळला आहे.