‘वर्ष 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत मी मिळवलेलं सगळं दैदिप्यमान यश घ्या, पण माझ्या वडिलांना पूर्णपणे बरे करा’…अशाप्रकारचे भावूक आवाहन इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने केले आहे.

ब्रिटनच्या डेली मिरर वृत्तपत्राशी बोलताना, “2019 हे वर्ष माझ्यासाठी असामान्य यश देणारे ठरले. माझ्याकडून दमदार कामगिरी झाली, पण आता माझे वडील रुग्णालयात आहेत. तुझे वडील पूर्णतः बरे होतील आणि नेहमीप्रमाणे हसतखेळत दिसतील पण त्यासाठी तू 2019 मध्ये मिळवलेलं सगळं यश मला द्यायचं असं जर मला कोणी म्हणालं तर मी त्यासाठी तयार आहे. मी जिंकलेलं सगळं घ्या, पण माझ्या वडिलांना पूर्णपणे बरे करा”, अशा शब्दात स्टोक्सने आपल्या भावना व्यक्त केल्यात.

बेन स्टोक्‍सचा इंग्लंड संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. बेन स्टोक्सचे वडील गेड स्टोक्‍स हे देखील ही मालिका पाहण्यासाठी आले होते. पण या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू असतानाच त्यांना काही गंभीर आजारास्तव रुग्णालयात दाखल करावे लागले. वडील रुग्णालयात दाखल झाल्यामुळे बेन स्टोक्‍स पहिला कसोटी सामना खेळू शकला नाही. त्याचे वडील सध्या जोहान्सबर्गमधील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यामुळे बेन स्टोक्स दुसरा कसोटी सामना खेळण्याची शक्यता बळावली आहे. विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडला प्रथमच विजेतेपद मिळवून देण्यात बेन स्टोक्‍सचा मोठा हात होता. तर, त्यानंतर झालेल्या प्रतिष्ठेच्या  अ‍ॅशेस कसोटी मालिकेत खडतर परिस्थितीतही इंग्लंडला बरोबरी मिळवून देण्यात त्याने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती.