‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुलीचे स्पष्टीकरण; दोन बैठकांमध्ये विविध पर्यायांवर चर्चा

करोनामुळे उद्भवलेली परिस्थिती निवळल्यानंतर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) झाल्यास सामन्यांच्या संख्येत कपात होईल, असे ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केले आहे. सामन्यांची संख्या कमी करणे, हा एक पर्याय आहे. मात्र सध्या तरी लीग कधी सुरू होईल, हे सांगणे कठीण असल्याचे संघमालकांनी सांगितले.

‘आयपीएल’ (आयपीएल) क्रिकेटच्या १३व्या हंगामाच्या भवितव्यासंदर्भात मुंबईत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) पदाधिकारी आणि आठ संघमालक यांच्यात शनिवारी झालेल्या बैठकीत विविध पर्यायांवर गांभीर्याने चर्चा झाली. त्यानंतर प्रशासकीय समितीच्या बैठकीत या पर्यायांसंदर्भात धोरण निश्चित करण्यात आले.

करोनामुळे केंद्र सरकारने लागू केलेले प्रवासाचे निर्बंध आणि महाराष्ट्र, दिल्ली आणि कर्नाटक या तीन राज्यांनी सामन्यांच्या आयोजनासाठी नाकारलेली परवानगी या पार्श्वभूमीवर ‘बीसीसीआय’ने शुक्रवारी ‘आयपीएल’ १५ एप्रिलपर्यंत स्थगित केले आहे. ही लीग २९ मार्चपासून सुरू होणार होती. शनिवारी झालेल्या बैठकीनंतर गांगुली म्हणाला की, ‘‘सध्या तरी ‘आयपीएल’ १५ एप्रिलपर्यंत होणार नाही. म्हणजेच हे दिवस वायाच जाणार आहेत. त्यामुळे सामन्यांची संख्या कमी होणे स्वाभाविक आहे; पण नेमके किती सामने होतील, हे मला सध्या तरी सांगता येणार नाही.’’

परदेशात ‘आयपीएल’चे स्थलांतर करण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. ‘बीसीसीआय’, ‘आयपीएल’ आणि प्रक्षेपण वाहिनी स्टार स्पोर्ट्स यांनी आर्थिक नुकसान सहन करण्याची तयारी दर्शवल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘‘आरोग्य हे सध्या सर्वात महत्त्वाचे आहे. आम्ही आणि आमच्यापैकी कुणीही ‘आयपीएल’ कधी सुरू होईल, हे सांगू शकणार नाही. दोन किंवा तीन आठवडय़ांनंतर आम्ही परिस्थितीचा आढावा घेऊ आणि स्पर्धा होऊ शकेल, अशी आशा राखू शकतो,’’ असे किंग्ज इलेव्हन पंजाबचे मालक नेस वाडिया यांनी सांगितले.

‘‘या बैठकीत प्रत्येकाने नागरिकांची सुरक्षा हे महत्त्वाचे असून, अर्थकारण हे नंतर येते. सरकारच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी आम्ही बांधील आहोत. त्यामुळे महिन्याअखेपर्यंत ‘आयपीएल’चा कोणताही निर्णय होऊ शकेल, असे वाटत नाही. परिस्थिती सुधारेल, याची आशा आहे,’’ असे वाडिया यांनी सांगितले.

‘‘येत्या दोन ते तीन आठवडय़ांत स्पष्टता आल्याशिवाय कोणताही निर्णय होणार नाही. परदेशी खेळाडू ‘आयपीएल’साठी भारतात येतील का? या प्रश्नालाही माझ्याकडे उत्तर नाही. कारण या खेळाडूंवर १५ एप्रिलपर्यंत सध्या तरी निर्बंध आहेत. त्यामुळे करोनाचा प्रभाव ओसरल्यावर ‘आयपीएल’ झाले तर चांगले होते; पण झाले नाही, तर परिस्थिती स्वीकारण्याशिवाय पर्याय नसेल,’’ असे वाडिया यांनी सांगितले.

‘‘बैठकीतील पर्यायांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आणखी एक बैठक होईल. सध्या तरी आम्ही सर्वच जण परिस्थितीची पाहणी करीत आहोत. नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता हे आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर लीगच्या आयोजनाच्या सर्व पर्यायांवर चर्चा होईल,’’ असे दिल्ली कॅपिटल्स संघाचे मालक पार्थ जिंदाल यांनी सांगितले.

‘‘खेळाडू, चाहते आणि संघ व्यवस्थापन यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. आरोग्य संस्था आणि सरकार यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करणे महत्त्वाचे आहे,’’ असे कोलकाता नाइट रायडर्स संघाचा मालक शाहरूख खानने सांगितले.

‘आयपीएल’पुढील पर्याय

संघमालक आणि ‘बीसीसीआय’ यांच्यात झालेल्या बैठकीत खालील पर्यायांवर चर्चा झाली.

१ ‘आयपीएल’च्या सामन्यांची संख्या कमी करणे.

२ प्रत्येकी चार संघ दोन गटांत विभागून अव्वल चार संघांमध्ये बाद फेरीचे सामने खेळवणे.

३ प्रत्येक संघ एकमेकांशी दोनदा खेळेल अशा प्रकारे रचना करून सामन्यांची संख्या वाढवणे, पण हे सामने शनिवार-रविवार वगळता अन्य दिवशी घ्यावेत.

४ असमर्थता दर्शवणाऱ्या दोन ठिकाणचे सर्व सामने स्थगित करावेत.

५ भागधारकांचे नुकसान होऊ नये, या हेतूने नियोजित ६० सामन्यांची कमी कालावधीत  आखणी करून ते प्रेक्षकांविना खेळवण्यात यावेत.