बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी रविवारी (१४ जून) गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र व्यावसायिक वैमनस्य आणि त्यातून आलेले नैराश्य यापुढे सुशांतने हार मानली अशी चर्चा सध्या सिनेवर्तुळात रंगली आहे. ३४ वर्षांच्या सुशांतने आधी छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम केले. त्यानंतर त्याच्या सिनेकारकिर्दीला सुरूवात झाली. २०१३ मध्ये ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र त्याची महेंद्रसिंग धोनीच्या चरित्रपटातील भूमिका सर्वाधिक गाजली.

सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्यानंतर साऱ्यांनाच धक्का बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते क्रीडा आणि मनोरंजन विश्वातून त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. सुशांतने ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात प्रमुख भूमिका केली. धोनीच्या खेळीपासून ते धोनीच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या सवयीपर्यंत सुशांतने धोनीचा खूप चांगल्या पद्धतीने अभिनय केला. त्याच्या या अभिनयाची साऱ्यांनीच वाहवा केली. स्वत: धोनीनेदेखील त्याच्या अभिनयाच्या प्रेमात पडला होता. मोठ्या पडद्यावर स्वत:लाच बघताना मला खूप मजा आली, अशा शब्दात धोनीने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. धोनीच्या चित्रीकरणादरम्यान शोएब अख्तर मुंबईत होता. त्यावेळचा एक किस्सा त्याने आपल्या यु-ट्यूब चॅनेलवर सांगितला.

“२०१६ साली मी मुंबईतल्या ऑलिव्ह हॉटेलमध्ये सुशांतला भेटलो होतो. त्यावेळी माझ्याशी बोलण्याचे त्याचे धाडस झाले नाही. तो माझ्या बाजूने डोकं खालच्या दिशेला करून निघून गेला. त्यानंतर माझ्या एका मित्राने मला सांगितलं की हा अभिनेता धोनीची भूमिका करणार आहे. त्यावेळी मला उत्सुकता होती की त्याने धोनीची भूमिका कशी निभावली आहे ते पाहुया. धोनी चित्रपट हिट झाला, पण मुंबईतील त्या भेटीच्या वेळी मी त्याला थांबवून त्याच्याशी काहीच बोललो नाही याची मला खंत आहे. मी माझ्या आयुष्यातील काही अनुभव त्याला सांगितले असते. कदाचित ते अनुभव ऐकून त्याला त्याच्या जीवनात थोडा फायदा झाला असता. पण तसं घडलंच नाही. मी त्याच्याशी बोललो नाही याचा मला आता पश्चात्ताप होतोय”, असे अख्तर म्हणाला.

दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येनंतर अख्तरने त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला होता. “एका अत्यंत मौल्यवान व्यक्तीला आपण साऱ्यांनी गमावलं हे ऐकून खूपच वाईट वाटलं. महेंद्रसिंग धोनी चित्रपटात त्याने केलेली भूमिका मी पाहिली होती. त्याने धोनीची भूमिका हुबेहुब वठवली होती. तो खूप परिश्रम करणारा तरूण होता. फार वाईट झालं”, असं ट्विट करत शोएब अख्तरने त्याला श्रद्धांजली वाहिली होती.