आशिया चषकाचं विजेतेपद मिळवल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास सध्या चांगलाच दुणावला आहे. सध्या विराट कोहलीचा भारतीय संघ ४ ऑक्टोबरपासून सुरु होणा वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेसाठी तयारी करतोय. मात्र काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेत आलेलं अपयश, अजुनही टीम इंडियाची पाठ सोडत नाहीये. टी-२० मालिका जिंकल्यानंतर भारताला वन-डे व कसोटी मालिकेत पराभवाला सामोरं जावं लागलं. यानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकांनाही टिकेचं लक्ष्य व्हावं लागलं, मिळालेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाची प्रशासकीय समिती भारतीय संघासाठी फिरकी गोलंदाज प्रशिक्षक नेमण्याच्या तयारीत आहे.

मुंबई मिरर वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, आशिया चषकाला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी क्रिकेट प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांची भेट घेतली. या बैठकीत भारतीय संघासाठी फिरकी गोलंदाज प्रशिक्षक नेमण्याबद्दल चर्चा झाल्याचं समजतं आहे. सध्या रवी शास्त्री हे भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक असून त्यांच्यासोबत संजय बांगर (फलंदाजी प्रशिक्षक), भारत अरुण (गोलंदाजी प्रशिक्षक) आणि आर. श्रीधर (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक) ही मंडळीही भारतीय संघाला प्रशिक्षण देतात.

या बैठकीत रवी शास्त्री यांनी प्रशासकीय समितीकडे परदेश दौऱ्यात मालिका सुरु होण्यापूर्वी सराव सामने आयोजित करण्याची मागणी केली आहे. इंग्लंड दौऱ्यात भारतीय गोलंदाजांनी केलेल्या खराब कामगिरीमुळे प्रशासकीय समिती फिरकी गोलंदाज प्रशिक्षक नेमण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. विशेषकरुन रविचंद्रन आश्विन इंग्लंड दौऱ्यात पुरता अपयशी ठरला होता. ज्या सामन्यात मोईन अलीसारख्या कामचलाऊ फिरकीपटूने भारताच्या दिग्गज खेळाडूंना माघारी धाडलं, त्या सामन्यात आश्विन इंग्लंडची जोडी फोडू शकला नव्हता.