नवी दिल्ली : जलतरण तलाव सरावासाठी उपलब्ध न केल्यास खेळातून निवृत्ती घेऊ, असा इशारा आशिया क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेता वीरधवल खाडेने दिला आहे. करोनामुळे गेले तीन महिने जलतरण तलाव बंद आहेत.
‘‘जलतरण तलाव पुन्हा कधी सुरू होणार याबाबत काहीच सांगण्यात येत नाही. अन्य खेळांप्रमाणेच जलतरणाच्या बाबतीतही सरकारकडून न्याय अपेक्षित आहे. अन्यथा खेळातून निवृत्ती घेण्याचा विचार करावा लागेल,’’ असे वीरधवलने केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्यासह जलतरण महासंघाला उद्देशून ट्विटरवर म्हटले आहे. महाराष्ट्रात मैदानांना प्रेक्षकांशिवाय उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र जलतरणाला अजूनही बंदी आहे. ‘‘गेल्या तीन महिन्यांमध्ये जलतरणपटूंना जलतरणाचा सराव करता आलेला नाही. जर अन्य खेळांमधील खेळाडू सामाजिक अंतर ठेवून सराव करत असतील तर जलतरणपटूदेखील त्यादृष्टीने काळजी घेतील. टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा एका वर्षांवर असतानाही जर त्यासाठी सराव करता येत नसेल तर भारतातील सर्वच जलतरणपटूंचे नुकसान आहे,’’ असेही वीरधवलने सांगितले.
थायलंड, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड येथे जलतरणाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे तेथील जलतरणपटू सराव करत आहेत, याकडेही वीरधवलने लक्ष वेधले. टोक्यो ऑलिम्पिकसाठी ज्या जलतरणपटूंना ‘ब’ श्रेणी मिळाली आहे त्यांना जलतरण तलाव उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही भारतीय जलतरण महासंघाकडून (एसएफआय) गेल्या महिन्यात क्रीडा मंत्रालयाला करण्यात आली आहे. ‘‘व्यावसायिक जलतरणपटूंना सरावासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करूनही ती क्रीडा मंत्रालयाने मान्य केलेली नाही. देशातील कुठल्याच राज्य सरकारांकडून खेळाडूंना जलतरणासाठी परवानगी मिळत नाही,’’ असे ‘एसएफआय’चे सरचिटणीस मोनल चोक्सी यांनी सांगितले.
भारताचे हे जलतरणपटू सरावापासून दूर
टोक्यो ऑलिम्पिकसाठी ज्या जलतरणपटूंना ‘ब’ श्रेणी मिळाली आहे त्यामध्ये वीरधवलसह साजन प्रकाश आणि श्रीहरी नटराज या भारताच्या खेळाडूंचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू अर्थातच टोक्यो ऑलिम्पिकची तयारी सुरू करण्यासाठी आतुर आहेत. ‘‘क्रीडा मंत्रालयाकडून जलतरणपटूंच्या सरावाबाबत काहीच बोलण्यात येत नाही. अव्वल जलतरणपटूंना लवकरात लवकर जलतरणाच्या सरावाला सुरुवात करू द्यावी,’’ असे जलतरणातील अव्वल प्रशिक्षक निहार अमीन यांनी सांगितले.