पहिल्या ऑलिम्पिक स्पध्रेसाठी सिंधू उत्सुक

सलग दोन जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पध्रेतील कांस्यपदके पी. व्ही. सिंधूच्या गाठीशी आहेत. मात्र जागतिक स्पध्रेतील पदकापेक्षा ऑलिम्पिक पदक हे लाखमोलाचे आहे, असे मत सिंधूने व्यक्त केले आहे. ऑगस्टमध्ये रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पध्रेत ती प्रथमच सहभागी होत आहे.

‘‘जागतिक अजिंक्यपद स्पध्रेतील पदकापेक्षा ऑलिम्पिक पदकाला अतिशय महत्त्व आहे. ऑलिम्पिकमधील पदक जिंकणे, हे प्रत्येक खेळाडूच्या आयुष्याचे ध्येय असते. मात्र तेथील वातावरण हे पूर्णत: वेगळे असते; परंतु माझ्या कारकीर्दीतील हे पहिलेच ऑलिम्पिक असल्यामुळे मी अतिशय उत्सुक आहे,’’ असे हैदराबादच्या सिंधूने सांगितले.

२० वर्षीय सिंधू जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत १०व्या स्थानावर आहे, तर सायना नेहवाल क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. ब्राझीलमध्ये ५ ते २१ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेतील बॅडमिंटन या खेळात भारताला सिंधू आणि सायनाकडून पदकाच्या अपेक्षा आहेत.

ऑलिम्पिकला प्रारंभ होईल, त्या दिवसाच्या बरोब्बर एक महिना अगोदर सिंधू २१ वर्षांची होईल. मागील लंडन ऑलिम्पिकपेक्षा यंदा दोन बॅडमिंटनपटू अधिक पात्र ठरले आहेत, याबाबत आनंद प्रकट करताना सिंधू म्हणाली, ‘‘ऑलिम्पिकसाठी सात खेळाडूंची झालेली निवड ही भारतीय बॅडमिंटनसाठी आनंददायी गोष्ट आहे. महिला दुहेरीत ज्वाला गट्टा आणि आरती पोनप्पा दुसऱ्यांदा, तर मनू अत्री आणि बी. सुमीत रेड्डी प्रथमच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहेत. के. श्रीकांतसुद्धा पहिल्यांदाच सहभागी होणार असल्याने तोही माझ्याप्रमाणेच उत्सुक आहे.’’

‘‘ऑलिम्पिकच्या दृष्टीने आमचा खडतर सराव सुरू आहे. मात्र स्पध्रेकरिता स्वत:ला तंदुरुस्त आणि दुखापतमुक्त ठेवणे, ही आमची प्रमुख जबाबदारी आहे,’’ असे सिंधूने सांगितले.

‘‘ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेत चांगली कामगिरी करायची, अशी मनाशी खूणगाठ बांधली आहे. याचे कोणतेही अतिरिक्त दडपण मनावर नाही. प्रथमच ऑलिम्पिकमध्ये भाग घेत असल्याने पहिला सामना खेळेपर्यंत माझी उत्कंठा टिकून आहे. इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया येथील स्पर्धा खेळल्यानंतर एक महिन्याचे विशेष प्रशिक्षण आम्ही घेऊ आणि त्यानंतरच रिओ ऑलिम्पिकला प्रयाण करू,’’ असे तिने सांगितले.

स्पध्रेतील आव्हानांविषयी सिंधू म्हणाली, ‘‘जागतिक क्रमवारीतील पहिल्या २० क्रमांकांवरील खेळाडूंपैकी कोण पदक जिंकेल, हे सांगणे खरेच कठीण आहे. ज्या दिवशी खेळाडूचा खेळ उंचावेल, तो त्या दिवशी जिंकेल. त्यामुळे कोणत्याही खेळाडूला कमी लेखून चालणार नाही. सध्या तरी थायलंडची माजी जगज्जेती

रॅटचानोक इन्टानॉन ऑलिम्पिक जेतेपदासाठी दावेदार मानली जाते. याशिवाय चायनीज तैपेईची ताई झु यिंगसुद्धा फॉर्मात आहे.’’