सेरेना विल्यम्स हिने डाव्या पायाच्या घोटय़ाच्या दुखापतीमुळे मायामी खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतली असून महिलांमध्ये अग्रमानांकित टेनिसपटू नाओमी ओसाका हिला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. पुरुषांमध्येही अलेक्झांडर झ्वेरेव्हचे आव्हान संपुष्टात आले असून रॉजर फेडररने विजयी घोडदौड कायम राखत आगेकूच केली आहे.

सेरेनाने गुडघ्याच्या दुखापतीचे कारण देत स्पर्धेतून माघार घेतली आहे. जपानच्या ओसाकाला तैवानच्या सिएह सू वेईने ४-६, ७-६, ६-३ असे पराभूत केले. ओसाका बाहेर पडल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. तसेच पुढील आठवडय़ात जाहीर होणाऱ्या क्रमवारीवरही या निकालाचा परिणाम दिसून येणार आहे.

फेडररने राडू अल्बोटवर ४-६, ७-५, ६-३ असा विजय मिळवला. तर झ्वेरेव्हला डेव्हिड फेररकडून २-६, ७-५, ६-३ असा पराभव पत्करावा लागला. तर सेरेनाने रिबेका पीटरसनला ६-३, १-६, ६-१ असे पराभूत केल्यानंतर गुडघ्याच्या दुखापतीमुळे माघार घेत असल्याचे जाहीर केले, त्यामुळे तिचे चाहते निराश झाले आहेत. सेरेनाच्या माघारीमुळे पुढील फेरीतील प्रतिस्पर्धी क्विआंग वॅँग ही आता थेट चौथ्या फेरीत दाखल झाली आहे.