थिएम व स्वितोलिना यांना पराभवाचा धक्का

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा

फ्लशिंग मेडोजवरील चाहत्यांमध्ये उत्सुकता असलेल्या रॅफेल नदाल व रॉजर फेडरर यांनी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. विजेतेपदाच्या शर्यतीत असलेले डॉमिनिक थिएम व एलिना स्वितोलिना यांना पराभवाचा धक्का बसला.

नदाल व फेडरर यांनी उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळविला, तर या दोन महान खेळाडूंमध्येच उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. येथील चाहत्यांना याच लढतीची उत्सुकता आहे. नदाल याने जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानास साजेसा खेळ करीत युक्रेनच्या अ‍ॅलेक्झांडर दोग्लोपोलोव्ह याचा ६-२, ६-४, ६-१ असा धुव्वा उडविला. तृतीय मानांकित फेडरर यानेही फिलीप कोहेलश्रेबर याला ६-४, ६-२, ७-५ असे सरळ तीन सेट्समध्ये नमवले. अर्जेन्टिनाचा जुआन मार्टिन डेलपोत्रो याने सहावा मानांकित थिएम याच्यावर १-६, २-६, ६-१, ७-६ (७-१), ६-४ असा रोमहर्षक विजय नोंदवला. महिलांमध्ये अग्रमानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिच्या झंझावती खेळापुढे स्थानिक खेळाडू जेनिफर ब्रॅडी हिचा ६-१, ६-० असा फडशा पडला. युक्रेनच्या स्वितोलिना या चौथ्या मानांकित खेळाडूची विजयी घोडदौड पंधरावी मानांकित मेडिसन केईज हिने संपुष्टात आणली. हा सामना तिने ७-६ (७-२), १-६, ६-४ असा जिंकला. कोको व्हॅन्डेवेघे हिने अनपेक्षित विजयाची मालिका सुरू ठेवताना ल्युसी साफारोव्हा हिच्यावर ६-४, ७-६ (७-२) अशी मात केली. इस्तोनियाच्या काई कानेपी हिने अपराजित्व राखताना रशियाच्या दारिया कास्ताकानिया हिला ६-४, ६-४ असे हरवले.

डेलपोत्रोचा रोमहर्षक विजय

डेलपोत्रो याने थिएमविरुद्ध अतिशय जिगरबाज खेळ करीत विजयश्री खेचून आणली. पहिल्या दोन सेट्समध्ये त्याला सव्‍‌र्हिस व परतीच्या फटक्यांवर नियंत्रण राखता आले नाही. या दोन्ही सेट्समध्ये थिएम याने जमिनीलगत परतीच्या फटक्यांचा बहारदार खेळ केला. तिसऱ्या सेटपासून डेलपोत्रो याला सूर सापडला. त्याने फोरहँडचे ताकदवान फटके व बिनतोड सव्‍‌र्हिस करीत तिसरा सेट घेतला. चौथ्या सेटमध्ये टायब्रेकपर्यंत झुंज झाली. टायब्रेकरमध्ये डेलपोत्रो याने निर्विवाद वर्चस्व गाजवले. मात्र, थिएम याने धीर सोडला नाही. पाचव्या सेटबाबत रंगत निर्माण झाली. थिएम याला दोन वेळा मॅचपॉईन्टची संधीही लाभली. तथापि डेलपोत्रो याने चिवट झुंज देत या दोन्ही संधींपासून थिएमला वंचित ठेवले. अखेर दहाव्या गेममध्ये त्याने पूर्ण ताकदीनिशी खेळ केला व ही रोमहर्षक लढत जिंकली. डेलपोत्रो याला उपांत्यपूर्व फेरीत फेडरर याच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. त्याने २००९ मध्ये येथील अंतिम फेरीत फेडरर याची सलग पाच विजेतेपदांची मालिका खंडित केली होती.

बोपण्णाचे आव्हान संपुष्टात

भारताच्या रोहन बोपण्णा याचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. बोपण्णा व कॅनडाची गॅब्रिएला डॅब्रोवस्की या जोडीला तैवानची हाओ चिंगचान व न्यूझीलंडचा मायकेल व्हीनस यांनी हरवले. अतिशय चुरशीने झालेली ही लढत चिंगचान व मायकेल यांनी ४-६, ६-३, १०-८ अशी जिंकली व उपांत्य फेरी गाठली. बोपण्णा व डॅब्रोवस्की यांनी यंदा फ्रेंच ओपन स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले होते. येथे त्यांना सातवे मानांकन मिळाले होते. त्यांनी पहिला सेट जिंकला मात्र, दुसऱ्या सेटमध्ये त्यांना खेळावर नियंत्रण ठेवता आले नाही. तिसऱ्या सेटमध्ये त्यांनी आव्हान राखण्यासाठी जिद्दीने खेळ केला पण निर्णायक क्षणी त्यांनी केलेल्या अक्षम्य चुकांचा फायदा चिंगचान व मायकेल यांना झाला.