News Flash

रॉजर फेडररचा सामना अँडी मरेशी

विक्रमी १८व्या ग्रँड स्लॅमसाठी आतूर रॉजर फेडररला विम्बल्डनची अंतिम फेरी गाठण्यासाठी अँडी मरेचा अडथळा पार करावा लागणार आहे.

| July 10, 2015 06:12 am

विक्रमी १८व्या ग्रँड स्लॅमसाठी आतूर रॉजर फेडररला विम्बल्डनची अंतिम फेरी गाठण्यासाठी अँडी मरेचा अडथळा पार करावा लागणार आहे. घरच्या मैदानावर, चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा असलेल्या मरेविरुद्ध फेडररची कामगिरी १२-११ अशी आहे. विम्बल्डन स्पर्धेची सात जेतेपदे नावावर असणाऱ्या फेडररला मरेने नेहमीच कडवी टक्कर दिली आहे. त्यामुळे अडीच वर्षांचा ग्रँड स्लॅम जेतेपदांचा दुष्काळ संपवण्यासाठी फेडररला सर्वोत्तम प्रदर्शन करावे लागेल. ग्रँड स्लॅम स्पर्धेत मरेविरुद्ध फेडररची कामगिरी ४-१ अशी आहे. २०१२ मध्ये मरेवर मात करत फेडररने विम्बल्डनचे जेतेपद पटकावले होते. फेडररचे हे शेवटचे ग्रँड स्लॅम जेतेपद आहे.
२०१३मध्ये विम्बल्डन जेतेपदाची कमाई करणाऱ्या मरेला ग्रँड स्लॅम जेतेपदांमध्ये सातत्य राखता आलेले नाही. घरच्या मैदानावर इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची मरेला संधी आहे. सार्वकालीन महान फेडरर आणि इंग्लंडची आशा असलेला मरे यांच्यातला हा मुकाबला यंदाच्या बहुचर्चित लढतींपैकी एक आहे. यामुळे नोव्हाक जोकोव्हिच आणि रिचर्ड गॅस्क्वेट यांच्यात होणारा उपांत्य फेरीचा दुसरा सामना झाकोळला गेला आहे. केव्हिन अँडरसनविरुद्ध दोन सेट गमावल्यानंतरही संघर्षमय विजय मिळवत जोकोव्हिचने उपांत्य फेरी गाठली आहे.
दुसरीकडे फ्रेंच खुल्या स्पर्धेचा विजेता स्टॅनिसलॉस वॉवरिन्काला नमवत रिचर्ड गॅस्क्वेटने खळबळजनक विजय मिळवला. गॅस्क्वेटविरुद्धच्या १३ लढतींपैकी १२ सामने जोकोव्हिचनेजिंकले आहेत. त्यामुळे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आणि अव्वल मानांकित जोकोव्हिचचे पारडे जड मानले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2015 6:12 am

Web Title: roger federer to face andy murray in semifinals
Next Stories
1 सुनील छेत्रीसाठी चढाओढ
2 आता आव्हान झिम्बाब्वेचे
3 बक्षीस रक्कम समान झाल्याशिवाय राष्ट्रीय स्पर्धा खेळणार नाही -दीपिका पल्लीकल
Just Now!
X