Wimbledon 2018: टेनिस विश्वातला अनभिषीक्त सम्राट अशी ओळख असलेल्या रॉजर फेडररला बुधवारी विम्बल्डन स्पर्धेत पराभवाचा धक्का बसला. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनने फेडररवर ६-२,७-६, (७-५), ५-७,४-६,११-१३ अशी मात केली. या विजयासह केविनने उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे.

तब्बल सव्वाचार तास चाललेल्या चुरशीच्या लढतीनंतर अँडरसनने फेडररवर थरारक विजयाची नोंद केली. फेडररला सामन्यात विजयाची संधी मिळाली होती पण अँडरसनने तिसऱ्या सेटमध्ये फेडररकडून मॅच पाँईट हिरावून घेतला आणि रोमांचक विजयाची नोंद केली. पहिला सेट फेडररने ६-२ असा आरामात जिंकला. त्यासेटमध्ये फेडररच्या चौफेर खेळापुढे अँडरसनकडे कुठलेही उत्तर नव्हते.

फेडररने विम्बल्डनमध्ये मागच्या ८५ गेममध्ये आपली सर्व्हीस राखून गेम जिंकले होते. अँडरसनने फेडररची सर्व्हीस ब्रेक करुन ती घोडदौड थांबवली. फेडरर नवव्यांदा विम्बल्डनचे जेतेपद पटकावून कारकिर्दीतील २१ वे ग्रँड स्लॅम जिंकण्याच्या इराद्याने कोर्टवर उतरला होता. यंदा नोवाक जोकोविच, राफेल नादाल चांगल्या फॉर्ममध्ये आहेत तरीही फेडररला विजयासाठी पसंती दिली जात होती.