भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाविरूद्धचा तिसरा कसोटी सामना गुरूवारपासून सुरू होणार आहे. या सामन्यासाठी मुंबईकर जोडगोळी संघाचं नेतृत्व करणार आहे. अजिंक्य रहाणे संघाचा कर्णधार तर रोहित शर्मा उपकर्णधार असणार आहे. IPL संपल्यापासून सुमारे तीन महिने रोहित क्रिकेटपासून दूर आहे. तिसरा कसोटी सामना रोहितसाठी पुनरामगनाचा सामना असणार आहे. या सामन्यात रोहितच्या खेळीकडे साऱ्यांचेच लक्ष असणार आहे. या दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण याने रोहित किती धावा काढू शकेल याबाबत अंदाज व्यक्त केला आहे.

धोनीच्या झिवाला मिळाली पहिली जाहिरात; तुम्ही पाहिलात का VIDEO?

“रोहित शर्माचे संघात पुनरागमन होत आहे ही भारतीय खेळाडूंसाठी आनंदाची बाब आहे. विशेषत: विराट नसताना रोहितच्या अनुभवाचा संघाला खूप फायदा होईल. सध्या भारतीय संघात एका ऊर्जेचा संचार झाला आहे. अशा वेळी तुमच्या ड्रेसिंग रूममध्ये अनुभवी खेळाडू असतील तर त्या ऊर्जेचा योग्य वापर कसा करावा याचं ते मार्गदर्शन करू शकतील. कारण पहिल्या सामन्यातील वाईट पराभवानंतर आपण १-१ अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे आता २-१ आणि मालिकेच्या शेवटापर्यंत ३-१ अशी आघाडी घेण्याची हीच योग्य वेळ आहे. अशा वेळी रोहितने आपली प्रतिभा दाखवणं गरजेचं आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि खेळपट्ट्यांवर रोहितची फलंदाजी नक्कीच बहरेल याची मला खात्री आहे. जर रोहितने सुरूवातीची षटकं नीट खेळून काढली तर त्याच्या बॅटमधून आपल्याला दमदार शतक पाहायला मिळू शकेल”, असं लक्ष्मण म्हणाला.

सचिन की द्रविड? शोएब अख्तरने निवडला आवडता क्रिकेटपटू

गेल्या दोन सामन्यात रोहित शर्माचा समावेश करण्यात आला नव्हता. रोहित ऑस्ट्रेलियात उशिरा दाखल झाल्याने पहिल्या दोन सामन्यांच्या वेळी तो क्वारंटाइन होता. त्याच्या जागी मयंक अग्रवालला संघात स्थान देण्यात आले होते. पण अग्रवालने चार डावांत अनुक्रमे १७, ९, ० आणि ५ अशा धावा केल्या. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत त्याला संधी मिळणं जवळपास अशक्य आहे.