२०१९-२०२० रणजी क्रिकेट स्पर्धेत मुंबईच्या संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. सलामीच्या सामन्यात बडोद्यावर मात केल्यानंतर, मुंबईला घरच्या मैदानावर रेल्वे आणि कर्नाटकविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. दोन्ही सामन्यांत मुंबईची फलंदाजी चांगलीच ढेपाळली. यानंतर ११ तारखेला मुंबईसमोर बलाढ्य तामिळनाडूचं आव्हान असणार आहे. या सामन्याआधी मुंबईचा सिनीअर खेळाडू आणि भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा संघासाठी धावून आला आहे.

अवश्य वाचा –  लोकं बोलत राहतील, तू लक्ष देऊ नकोस ! ऋषभ पंतची रोहितकडून पाठराखण

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर रोहितने आपल्या मुंबई संघातल्या सहकाऱ्यांशी गप्पा मारल्या. खडतर प्रसंगातून बाहेर येण्यासाठी काय करावं, खेळात नेमक्या काय सुधारणा करायला हव्यात याबद्दलही रोहितने आपल्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.

यादरम्यान मुंबईचे प्रशिक्षक विनायक सामंत, गोलंदाजी प्रशिक्षक प्रदीप सुंदरम आणि व्यवस्थापन अजिंक्य नाईकही उपस्थित होते. त्यामुळे आगामी सामन्यात मुंबईच्या खेळाडूंना रोहित शर्माने दिलेल्या टिप्सचा फायदा होतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – Ranji Trophy : कठोर निर्णयाची वेळ आली आहे, मानहानीकारक पराभवानंतर माजी खेळाडूंच्या प्रतिक्रिया