दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिला कसोटी सामना जिंकत १-० अशी आघाडी घेतली आहे. पुण्याच्या गहुंजे मैदानावर दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. रोहित शर्माने पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांमध्ये शतकी खेळी करत आपली निवड सार्थ ठरवली. रोहितने पहिल्या डावात १७६ तर दुसऱ्या डावात १२७ धावा केल्या. या खेळीनंतर रोहितचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात आलं. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंहनेही रोहितचं कौतुक करत, तो कसोटीत सेहवागपेक्षा घातक ठरु शकतो असं म्हटलं आहे.

“मला रोहितची कोणासोबतही तुलना करायची नाहीये. हो, पण विरेंद्र सेहवाग हा प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडायचा. जर सेहवागला तुम्ही लवकर बाद करु शकला नाहीत, तर तो दिवसाअखेरीस शतक ठोकायचा. रोहितही या बाबतीत कोणत्याही अंगाने मला कमी वाटत नाही, तो देखील मोठी धावसंख्या उभारु शकतो. रोहितचं फलंदाजीचं तंत्र सेहवागपेक्षा सरस आहे. माझ्यामते कसोटीत तो सेहवागपेक्षाही घातक ठरु शकतो. रोहितकडे फटक्यांचं वैविध्य आहे त्यामुळे खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर तो कसा खेळ करेल याचा अंदाज बांधता येत नाही.” एका वृत्तसमुहाला दिलेल्या मुलाखतीत हरभजन बोलत होता.

अवश्य वाचा – ICC Test Ranking – रोहित शर्मा-मयांक अग्रवालच्या क्रमवारीत सुधारणा

दरम्यान पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरनेही रोहितचं कौतुक करत त्याची तुलना विरेंद्र सेहवागशी केली होती. लोकेश राहुलच्या अपयशी कामगिरीमुळे रोहितला भारतीय कसोटी संघात स्थान मिळालं होतं. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहितच्या खेळाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – रोहितची फलंदाजी विरेंद्र सेहवागपेक्षा सरस – शोएब अख्तर