महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर विराट कोहलीकडे भारतीय संघाचं नेतृत्व आलं. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. परंतू आयसीसीच्या एकाही महत्वाच्या स्पर्धेचं विजेतेपद विराटला मिळवता आलेलं नाही. काही दिवसांपूर्वी क्रिकेट प्रेमी आणि काही माजी खेळाडूंनी Split Captaincy म्हणजेच कर्णधारपद विभागण्याचा पर्याय सूचवला होता. विराटकडे कसोटी संघाचं कर्णधारपद देऊन रोहित शर्माला टी-२० आणि वन-डे संघाचं कर्णधारपद सोपवण्यात यावं असं अनेकांचं म्हणणं होतं. भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्राच्या मते पुढील वर्षभरासाठी विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार राहिल, या परिस्थितीमध्ये कोणताही बदल होईल असं वाटत नाही. परंतू आगामी दोन टी-२० विश्वचषकांत विराट अपयशी ठरला तर भारतीय संघ नवीन नेतृत्वाबद्दल विचार करु शकतो.

विराट कर्णधार असो किंवा नसो, त्याच्या खेळावर परिणाम होईल असं मला अजिबात वाटत नाही. अशा परिस्थितीत भारताकडे रोहित शर्मा हा रेडीमेड ऑप्शन आहे, असं आकाश चोप्राने म्हटलं आहे. २०१४ साली विराटकडे भारताच्या कसोटी संघाचं कर्णधारपद आलं. यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाची कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे. २०१७ साली विराट भारताच्या तिन्ही संघांचा कर्णधार बनला. परंतू विराटला एकाही महत्वाच्या स्पर्धेचं विजेतेपद मिळवता आलेलं नाही. २०१७ चॅम्पिअन्स ट्रॉफीमधला भारताचा पराभव आणि २०१९ विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्धचा पराभव अशा दोन संधी विराटने गमावल्या आहेत.

Sports Presenter सावेरा पाशाच्या यू-ट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आकाशने आपलं मत मांडलं. “कर्णधारपदासाठी रोहित हा भारताकडचा चांगला पर्याय आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत ज्या-ज्या वेळेला रोहितने भारतीय संघाचं नेतृत्व केलेलं आहे त्यावेळी भारताने चांगली कामगिरी केली आहे. या बाबतीत भारतीय संघाला कधीही प्रॉब्लेम येणार नाही. समजा, आगामी ६ महिने किंवा वर्षभरात नेतृत्वबदलाची गरज लागली, तर संघाकडे रोहितचा पर्याय आहे. विराटच्या कामगिरीवर याचा परिणाम होणार नाही.” लॉकडाउन काळात सध्या सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद आहेत. ८ जुलैपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा एकदा सुरु होण्याच्या तयारीत आहे. विंडीज आणि इंग्लंडचे संघ ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत. त्यामुळे भारतीय संघ पुन्हा कधी मैदानावर उतरतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.