भारताचा धडाकेबाज खेळाडू रोहित शर्मा हा सध्या दुखापतीमुळे विश्रांती घेत आहे. न्यूझीलंड विरूद्ध उद्यापासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेतून त्याला माघार घ्यावी लागली आहे. पण तसे असले तरी त्याला क्रिकेटपासून दूर राहणे फारसे रूचत नाहीये. रोहिन सध्या क्रिकेट संदर्भातील एका गोष्टीची आतुरतेने वाट पाहतो आहे. तसा संदेश देखील त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला आहे.

जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या भारतातील मोटेरा मैदानाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मोटेरा हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम असणार आहे. हे स्टेडियम गुजरातमध्ये तयार करण्यात आले आहे. अहमदाबाद येथील ‘सरदार पटेल क्रिकेट स्टेडियम’चा कायापालट करण्यात आला असून अत्यधुनिक सुविधांनी युक्त असे मोटेरा स्टेडियम लवकरच क्रीडा सामन्यांसाठी खुले करण्यात येणार आहे. या मैदानावर खेळण्याची वाट रोहित शर्मा पाहत आहे. या स्टेडियमचा आकाशातू काढलेला फोटो (aerial view) BCCI ने ट्विट केला होता. त्यावर रोहितने आपली इच्छा व्यक्त केली आहे.

“मोटेरा स्टेडियमचे दृश्य हे खूपच विलोभनीय आहे. मी या स्टेडियमबद्दल खूप काही ऐकलेले आहे. त्यामुळे आता मी या स्टेडियममध्ये सामना खेळण्यासाठी फार काळ वाट पाहू शकत नाही”, असे ट्विट त्याने केले आहे.

एका वेळी तब्बल १ लाख १० हजार प्रेक्षकांची आसन क्षमता असणाऱ्या या स्टेडियमचे उद्घाटन अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते होणार आहे. २४ फेब्रुवारीला ट्रम्प हे अहमदाबादला येणार असून मोदी त्यांच्या राज्यात अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांचा खास पाहुणचार करणार आहेत. या स्टेडियममध्ये एकूण ७६ कॉर्पोरेट बॉक्स, ४ ड्रेसिंग रुम, क्लब हाऊस, ऑलिम्पिकच्या दर्जाचा स्विमिंग पूल आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट स्टेडियम हे जगातील सध्याचे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम मानले जाते. मेलबर्न क्रिकेट स्टेडियमची तब्बल ९० हजार प्रेक्षकांची क्षमता आहे. तर कोलकाताचे इडन गार्डन स्टेडियम हे भारतातील सध्याचे सर्वात मोठे स्टेडियम आहे. इडन गार्डन स्टेडियमची आसन क्षमता ६६ हजार इतकी आहे.

मेलबर्न क्रिकेट स्टेडियमचे डिझाईन तयार केलेल्या आर्किटेक्ट पॉप्युलर कंपनीलाच अहमदाबादमधील स्टेडियमच्या उभारणीचे काम देण्यात आले होते. हे स्टेडियम बांधण्यासाठी १० कोटी रुपये खर्च आला असून तेथे सुमारे १ लाख १० हजार लोक एकाच वेळी सामन्यासाठी बसू शकतात. एप्रिल महिन्यात या स्टेडियमवर पहिला सामना रंगणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच हे स्टेडियम फक्त क्रिकेटपुरते मर्यादित न राहता हॉकी, बास्केटबॉल,कबड्डी, लॉन टेनिस, बॅटमिंटन, स्विमिंग या खेळांनाही येथे प्राधान्य देण्यात येणार आहे.