ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्यानंतर भारतीय संघाच्या पहिल्या डावाची सुरूवात अडखळती झाली. सलामीवीर शुबमन गिल अवघ्या ७ धावांवर झेलबाद झाला. अनुभवी रोहित शर्मा मोठी खेळी करणार अशी चाहत्यांना आशा होती. पण ४४ धावांवर असताना बेजबाबदार फटका खेळत तो बाद झाला. आपली १००वी कसोटी खेळणाऱ्या फिरकीपटू नॅथन लायनने रोहितला माघारी धाडलं. संयमी खेळी करण्याची गरज असताना रोहित शर्मा क्रीजमधून पुढे आला आणि त्याने हवाई फटका खेळला. लायनने सीमारेषेवर लावलेल्या फिल्डरने रोहितचा सहज झेल पकडत त्याला तंबूत धाडले.

रोहित शर्माने तो फटका खेळल्यानंतर सारेच चाहते नाराज झाले. एक चांगली सुरूवात मिळाल्यानंतर रोहितला अर्धशतकही पूर्ण करता आले नाही. रोहित शर्माने ७४ चेंडूंमध्ये ४४ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत त्याने ६ चौकार लगावले. पण अतिशय खराब फटका खेळत तो बाद झाला. तिसऱ्या कसोटीतदेखील रोहित अर्धशतक पूर्ण करताच बेजबाबदार फटका खेळला होता. ५२ धावांवर असताना त्याने उसळता चेंडू हवेत टोलवला होता आणि मिचेल स्टार्कने त्याचा झेल घेतला होता. आजच्या त्याच्या खेळीवर मुंबईकर माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी टीका केली.

सध्याचा भारतीय संघ नवखा आहे. या नव्या दमाच्या संघात अनुभवाची कमतरता आहे हे साऱ्यांनाच माहिती आहे. संघात अनेक खेळाडू अगदीच नवोदित आहेत. संघात अनुभवाची उणीव आहे हे माहिती असूनही रोहित शर्माने लायनच्या गोलंदाजीवर तशा पद्धतीचा हवाई फटका खेळणं ही बाब खूपच खटकणारी आहे. त्याने तसा फटका खेळण्याचमागे काही स्पष्टीकरण असूच शकत नाही, अशा शब्दात मांजरेकर यांनी रोहितची कानउघाडणी केली.