भारतीय संघाचा सलामीवीर आणि मुळचा मुंबईकर असलेल्या रोहित शर्माची यंदाच्या मानाच्या खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. २०१९ चा विश्वचषक आणि त्याआधीच्या स्पर्धांमध्ये रोहितने केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे त्याचा सन्मान करण्यात आला. लहानपणी रोहितमधलं टॅलेंट ओळखणारे त्याचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनीही या कामगिरीबद्दल रोहितचं कौतुक केलं असून त्याने भारतासाठी २०२३ चा विश्वचषक जिंकावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.

“खेलरत्न सारखा पुरस्कार मिळणं ही खरंच खूप मोठी कामगिरी आहे. एखाद्या गरिब मुलाकडे गुणवत्ता असेल आणि त्याला नशिबाने साथ दिली तर तो खूप पुढे जातो, रोहित शर्मा हे याचं उदाहरण आहे. आतापर्यंत त्याने जे काही मिळवलं आहे ते त्याच्या मेहनतीच्या जोरावर मिळवलं आहे. २०२३ साली येणारा विश्वचषक रोहितने भारताला जिंकवून द्यावा अशी माझी इच्छा आहे.” मुंबई क्रिकेटमध्ये प्रसिद्ध असलेले दिनेश लाड कॉफी, क्रिकेट आणि बरंच काही या कार्यक्रमात बोलत होते.

२०१९ विश्वचषकात रोहितने ५ शतकं झळकावत आपला फॉर्म सिद्ध केला होता. यानंतर कसोटी क्रिकेटमध्येही त्याने चांगली कामगिरी केली. सध्या आयपीएलच्या तेराव्या हंगामानिमीत्त रोहित शर्मा युएईत आहे. २०१९ साली रोहितच्याच नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलचं विजेतेपद मिळवलं आहे.