नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सकडून सातत्याने खेळत असल्याने रोहित शर्माच्या तंदुरुस्तीच्या आशा बळावल्या आहेत. ११ नोव्हेंबरला भारतीय संघ विशेष विमानाने ऑस्ट्रेलियाला प्रयाण करणार असून, रोहितसुद्धा संघासोबत असू शकेल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे.

‘‘रोहित भारतीय संघासोबत असेल. फिजिओ नितीन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या तंदुरुस्तीच्या दृष्टीने योजना आखली जाईल. रोहितला एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती दिली जाईल, परंतु ट्वेन्टी-२० मालिकेत खेळवले जाऊ शकते. पण कसोटी मालिकेपूर्वी तो पूर्णत: तंदुरुस्त असेल,’’ अशीही माहिती मिळत आहे. रोहितच्या मांडीला दुखापत झाली असली, तरी त्याने दोन सामन्यांमध्ये खेळून तंदुरुस्त असल्याचा दावा केला आहे.

कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलिया वरचढ ठरेल -अक्रम

कराची : डिसेंबर-जानेवारी महिन्यात होणारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका रंगतदार होईल. परंतु ऑस्ट्रेलियाचा संघ भारतापेक्षा वरचढ ठरेल, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रमने व्यक्त केले आहे.

ऑक्टोबरच्या उत्तरार्धात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर तीन एकदिवसीय, तीन ट्वेन्टी-२० आणि चार कसोटी सामन्यांचा समावेश आहे. अ‍ॅडलेड येथे १७ डिसेंबरपासून पहिल्या कसोटीला प्रारंभ होईल.

‘‘पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हॅझलवूड यांचा समावेश असलेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान मारा जगात सर्वोत्तम दर्जाचा आहे. मात्र तरीही भारताकडून उत्तम प्रतिकार पाहायला मिळेल. पण अखेरीस ऑस्ट्रेलिया बाजी मारू शकेल,’’ असे अक्रमने म्हटले आहे.