टीम इंडियाच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघावरुन तयार झालेलं संभ्रमाचं वातावरण अद्याप कायम आहे. संघाचे फिजीओ नितीन पटेल यांनी रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याचा अहवाल दिल्यामुळे त्याची भारतीय संघात निवड झाली नाही. मात्र यानंतर रोहित शर्माने आयपीएलमध्ये हैदराबादविरुद्ध सामन्यात पुनरागमन करत आपण फिट असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र जोपर्यंत रोहित शर्मा बीसीसीआयची फिटनेस टेस्ट पूर्ण करत नाही तोपर्यंत त्याची भारतीय संघात निवड होणार नाही असा पवित्रा बीसीसीआयने घेतला आहे.

अवश्य वाचा – वरुण चक्रवर्ती ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकण्याची शक्यता

“टीम इंडियाचे फिजीओ नितीन पटेल जोपर्यंत हिरवा कंदिल दाखवत नाहीत…तोपर्यंत रोहितला भारतीय संघात स्थान मिळणार नाही. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने रोहितला फिट म्हणून घोषित करणं गरजेचं आहे.” BCCI मधील सुत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना माहिती दिली. रोहितने ही फिटनेस टेस्ट पास करावी अशी आमचीही इच्छा आहे. कारण विराट कोहली यंदा खासगी कारणामुळे अखेरच्या कसोटी सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माचा अनुभव संघाला फायदेशीर ठरु शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.

१० नोव्हेंबरला आयपीएलचा अंतिम सामना संपल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होईल. २७ नोव्हेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून दोन्ही संघ या मालिकेत ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे.