रोहित शेट्टी,आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू

तुषार वैती

गेल्या २० वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर इतकी मोठी झेप घेईन, याचा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. पण आता ‘आशिया-श्री’ किताब जिंकल्यानंतर माझा आत्मविश्वास उंचावला आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत देशाला सुवर्णपदक जिंकून देण्याचे माझे ध्येय आहे, असे मत भारताचा शरीरसौष्ठवपटू रोहित शेट्टीने व्यक्त केले. अलीकडेच इंडोनेशिया येथे झालेल्या ‘आशिया-श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या मुंबईकर रोहितच्या आतापर्यंतच्या प्रवासाविषयी केलेली ही बातचीत-

*  ‘आशिया-श्री’ सुवर्णपदक विजेतेपदापर्यंतचा प्रवास कसा होता?

२००१पासून मी शरीरबांधणी करण्यास सुरुवात केल्यानंतर तब्बल १० वर्षांनी मी स्पर्धामध्ये उतरण्यास सुरुवात केली. पहिल्याच वर्षी चार विजेतेपदांना गवसणी घातल्यानंतर माझा आत्मविश्वासही उंचावला. आपला मुलगा काही तरी चांगले काम करतोय, हे पाहून घरच्यांनीही मला पाठिंबा देण्याचे ठरवले. वडील फुटबॉलपटू असल्याने आपल्या मुलानेही क्रीडा क्षेत्रात नाव कमवावे, ही त्यांची इच्छा होती. आता भारतातील माझ्या प्रत्येक स्पर्धेला वडील आवर्जून हजेरी लावतात.

*  ‘आशिया-श्री’ जेतेपदाला गवसणी घातल्यानंतर काय भावना आहेत?

२०१७ साली मी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालो होतो. त्यानंतर जगात आपण कोणत्या स्तरावर आहोत, याची जाणीव झाली होती. त्यामुळे मी एक वर्षभर स्पर्धात्मक वातावरणापासून दूर राहून स्वत:च्या कमकुवत दुव्यांवर मेहनत घेत होतो. त्यानंतर ‘आशिया-श्री’ स्पर्धेवर मी लक्ष केंद्रित केले होते. आता सुवर्णपदक पटकावल्यानंतर माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आता अनेक जाहिरातींसाठी मला प्रस्ताव येऊ लागले आहेत. एक पाऊल पुढे टाकल्यानंतर आता जागतिक स्पर्धेसाठी मी मेहनत घेणार आहे.

*  जागतिक किंवा ऑलिम्पिया स्पर्धेत भारताचे शरीरसौष्ठवपटू कमी पडतात, याविषयी काय सांगशील?

शरीरसंपदा कमावण्यासाठी प्रत्येक जण मेहनत घेत असतात. पण भारतीय शरीरसौष्ठवपटूंना आर्थिक किंवा अन्य बाबतीत पाठबळ मिळत नाही, असे मला वाटते. या खेळात खर्च भरपूर असतो, उत्पन्न काहीच नसते. सरकारकडूनही भारतीय शरीरसौष्ठवपटूंना पाठिंबा मिळत नाही. इराण, इराक, चीन, जपानसारखे देश त्यांच्या शरीरसौष्ठवपटूंच्या पाठीशी भक्कमपणे उभे असतात. भारतीय शरीरसौष्ठवपटूंना मात्र स्वत:च्याच जिद्दीवर, मेहनतीवर आणि स्वमिळकतीवर पुढे यावे लागते. त्याचबरोबर देशातील वातावरण, विविध प्रकारच्या मांसाहाराची अनुपलब्धता आणि सकस अन्नाचा अभाव जाणवतो. तसेच आपले शरीरसौष्ठवपटू हे काही ना काही काम करून आपली आवड जपत असतात. त्यामुळे त्यांना दिवसातील २४ तास शरीरसौष्ठवासाठी वेळ द्यायला मिळत नाही. या सर्व गोष्टींमुळेच भारतीय शरीरसौष्ठवपटू हे परदेशातील शरीरसौष्ठवपटूंच्या तुलनेत कमी पडतात, असे मला वाटते.

*  आता तुझे पुढील ध्येय काय आहे?

जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा अवघ्या तीन आठवडय़ांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे माझ्या शरीराच्या सद्य:स्थितीची छायाचित्रे काढून मी कमकुवत बाजूंवर मेहनत घेत आहे. तीन आठवडय़ांच्या वेळात मी उत्तम शरीरसंपदा बनवण्यावर भर देत आहे. त्यासाठी मी माझ्या आहारात आणि व्यायामाच्या पद्धतीत बदल केला आहे. आता जीव ओतून कामगिरी करून जागतिक सुवर्णपदक पटकावण्याचे माझे ध्येय आहे.