रोमहर्षक सामन्यात तोरिनोला १-१ असे बरोबरीत रोखण्यात यश

नामांकित फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने अखेरच्या क्षणी ‘हेडर’द्वारे केलेल्या अप्रतिम गोलच्या बळावर युव्हेंटसने शुक्रवारी रात्री झालेल्या सेरी ए फुटबॉल स्पर्धेतील रोमहर्षक सामन्यात तोरिनोला १-१ असे बरोबरीत रोखले. या बरोबरीमुळे पुढील वर्षांच्या चॅम्पियन्स लीगसाठी पात्र होण्याच्या तोरिनोच्या आशा धुसर झाल्या आहेत. १९४९मध्ये बरोबर ७० वर्षांपूर्वी तोरिनोच्या फुटबॉल संघाला एका अपघाताला सामोरे जावे लागले होते. त्या अपघातात मरण पावलेल्या खेळाडूंना विजयाद्वारे श्रद्धांजली वाहण्यासाठी तोरिनोच्या खेळाडूंनी अथक परिश्रम घेतले.

१७व्या मिनिटाला युव्हेंटसच्या मिरालेम जॅनिचने आपल्या संघातील खेळाडूला चेंडू सोपवण्याऐवजी तोरिनोचा आक्रमणपटू सासा लुकीचकडे सोपवला. त्याची ही चूक युव्हेंटसला महागात पडली व १८व्या मिनिटाला लुकीचने तोरिनोसाठी पहिला गोल नोंदवला. यानंतर युव्हेंटसच्या खेळाडूंनी बरोबरी साधण्यासाठी कडवा संघर्ष केला, परंतु पहिल्या सत्रात तोरिनोला १-० अशी आघाडी कायम राखण्यात यश आले.

मध्यंतरानंतरदेखील पहिला गोल करण्यासाठी युव्हेंटसच्या खेळाडूंचे प्रयत्न सुरू राहिले. हा सामना जिंकून तोरिनो धक्कादायक विजयाची नोंद करणार असे वाटत असतानाच अनुभवी रोनाल्डो संघासाठी धावून आला. दोन बचावपटूंना भेदत त्याने उंचावरून आलेल्या चेंडूला गोलजाळ्याच्या दिशेने ‘हेडर’ लगावून तोरिनोचा गोलरक्षक सॅल्व्हाटोर सिरिगूला चकवले व युव्हेंटसला सामन्यात १-१ अशी बरोबरी साधून दिली.

या बरोबरीनंतर गुणतालिकेच्या पहिल्या स्थानी विराजमान असणाऱ्या युव्हेंटसचे ३५ सामन्यांतून २८ विजय, दोन पराभव व पाच बरोबरींसह ८९ गुण झाले असून दुसऱ्या क्रमांकावरील नापोलीपेक्षा (७०) ते १९ गुणांनी पुढे आहेत. त्यामुळे त्यांचे विजेतेपद जवळपास निश्चित झाले आहे. तोरिनो मात्र ३५ सामन्यांतून ५७ गुणांसह सहाव्या स्थानी आहे. रोनाल्डोने ‘हेडर’द्वारे लगावलेला गोल हा त्याचा यंदाच्या ‘सेरी ए’ हंगामातील २१वा गोल ठरला.