बेंगळूरुचा दिल्लीवर दिमाखदार विजय

दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुच्या एबी डी’व्हिलियर्सने ९० धावांची आतषबाजी करीत संघाला सहज विजय मिळवून दिला. अवघ्या ३९ चेंडूंत डी’व्हिलियर्सने ही अफलातून खेळी उभारली. त्याच्या या खेळीने संपूर्ण सामन्याचे चित्रच पालटून गेले.

त्याआधी, ऋषभ पंतच्या तडाखेबंद ८५ धावा व श्रेयस अय्यरच्या ५२ धावांच्या खेळीमुळे दिल्लीचा डाव १७४ धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला. उमेश यादव आणि युजवेंद्र चहल यांनी केलेल्या अत्यंत नियोजनबद्ध गोलंदाजीमुळे दिल्लीचे सलामीवीर कर्णधार गौतम गंभीर आणि जेसन रॉय या सलामीच्या जोडीला पाचव्या षटकापर्यंत बांधून ठेवले. प्रारंभीच्या चार षटकांमध्ये सलामीच्या जोडीला केवळ ११ धावाच करता आल्या. सहाव्या षटकाअखेर २ फलंदाज गमावून २८ धावा ही यंदाच्या मोसमातील पहिल्या पॉवरप्लेमधील सगळ्यात कमी धावसंख्या ठरली. त्यामुळे धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात गंभीर यादवच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. दोन्ही सलामीवीर गारद झाल्यानंतर जमलेल्या ऋषभ पंत व श्रेयस अय्यर या जोडीने संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. त्या दोघांनी मिळून ८ षटकांत ७५ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर ऋषभने राहुल तेवतियासमवेत ६५ धावांची भागीदारी केली.

संक्षिप्त धावफलक

  • दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत ५ बाद १७४ (ऋषभ पंत ८५, श्रेयस अय्यर ५२; यजुवेंद्र चहल २/२२) पराभूत वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु : १८ षटकात ४ बाद १७६ ( एबी डी’व्हिलियर्स ९०, विराट कोहली ३०; ग्लेन मॅक्सवेल १/१३)