ऑलिम्पिक विजेत्या तीन जणांसह रशियाच्या चालण्याच्या शर्यतीमधील पाच खेळाडूंवर उत्तेजक औषधे सेवनाबद्दल तीन वर्षे आणि दोन महिन्यांसाठी बंदीची कारवाई करण्यात आली आहे.
ऑलिम्पिक विजेते सर्जी किर्दाप्किन, व्हॅलेरी बोर्चिन, ओल्गा कानिस्किना या खेळाडूंबरोबरच जागतिक सुवर्णपदक विजेता सर्जी बाकुलीन व व्लादिमीर कनाकिन हे खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी आढळले. २०१२ पासून ही बंदीची कारवाई असल्यामुळे किर्दाप्किन याला २०१६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये ५० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत विजेतेपद राखण्याची संधी मिळणार आहे. मात्र बोर्चिनवर आठ वर्षांकरिता बंदी असल्यामुळे त्याची कारकीर्द संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. कनाकिन याच्यावर तहहयात बंदी घालण्यात आली आहे. बंदी घातलेल्या खेळाडूंची ऑलिम्पिक पदके मात्र काढून घेणार नसल्यामुळे त्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे.