‘त्या’ कसोटीनंतर तो निवृत्त होणार होता. शेवटच्या कसोटीतील शेवटचे बाद होणे, हा भावनिक क्षण. त्या क्षणानंतर पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायचे नाही हे पक्के होते. मात्र नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याने या बाद होण्याबाबतही मोठय़ा भावाशी चर्चा केली. ही मुलखावेगळी गोष्ट आहे क्रिकेटविश्वाचे आभूषण असलेल्या सचिन तेंडुलकरची. सचिन २०१३मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला. मात्र शेवटच्या बाद होण्याबाबतही त्याने मोठा भाऊ आणि मार्गदर्शक अजितशी तपशीलवार चर्चा केली. ‘अव्हिवा अली स्टार्टर्स’ कार्यक्रमाच्या निमित्ताने सचिन बोलत होता. मी बाद होणे कसे टाळू शकलो असतो, या संदर्भात आम्ही बोललो, असे सचिनने सांगितले.