मुंबईकर सचिन तेंडुलकर हा जागतिक क्रिकेटचा देव मानला जातो. सचिनने २४ वर्षांच्या समृद्ध कारकिर्दीत अनेक मोठे विजय भारतीय संघाला मिळवून दिले. त्याने केलेल्या विक्रमांच्या जोरावरच भारतीय क्रिकेटला जागतिक पटलावर मानाचं स्थान मिळालं. सचिनच्या आधी आणि नंतरही अनेक जण विविध विक्रम करत आहेत. पण सचिनने क्रिकेटमध्ये वेगळीच उंची गाठली होती. अतिशय तरूण असताना सचिनने क्रिकेटचा मार्ग निवडला आणि मग कधीही मागे पाहिलं नाही. पण हाच सचिन मुंबईच्या रस्त्यावर मात्र वाट चुकल्याचं दिसलं.
सचिनने आपल्या फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. सचिनच्या आपल्या आलिशान अशा कारमधून घरी परतत असतानाचा हा व्हिडीओ आहे. सचिन कांदिवलीहून बांद्र्याला त्याच्या घरी परतत असताना तो रस्ता चुकला. त्याला काहीच कळेना. विविध ठिकाणी कामं सुरू असल्याचे काही मार्ग वन-वे केले होते. त्यामुळे गाडीतील नकाशाचीही मदत त्याला घेता येत नव्हती. अशा वेळी मुंबईकर रिक्षा चालकाने त्याची मदत केली. मंगेश फडतरे या रिक्षा चालकाने सचिनला आपल्या रिक्षाला फॉलो करण्यास सांगितलं. सचिनने त्या रिक्षा चालकाची आपुलकीने चौकशी केली. तसेच, सचिनची कार मूळ रस्त्याला आल्यानंतकर सचिनने रिक्षा चालकाला एक सेल्फीही काढू दिला.
सचिनने हा व्हिडीओ आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला असून त्यात हा किस्सी जानेवारी २०२०चा असल्याचं नमूद केलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 25, 2020 6:10 pm