हितसंबंधाच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने भारतीय क्रिकेट नियामक मंडळावरच (बीसीसीआय) ताशेरे ओढले असून सद्य:स्थितीला ‘बीसीसीआय’ जबाबदार असल्याचा आरोप सचिनने केला आहे. ‘बीसीसीआय’च्या घटनेतील ‘नियंत्रित श्रेणी’नुसार परस्पर हितसंबंध येत असून या संपूर्ण प्रकरणाला ‘बीसीसीआय’ जबाबदार असल्याचा दावा त्याच्या खुलासा पत्रात केला आहे.

सचिनने ‘बीसीसीआय’चे लवाद अधिकारी डी. के. जैन यांना लिहिलेल्या पत्रात १३ मुद्दय़ांद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘बीसीसीआय’च्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांना बोलावून आपली भूमिका स्पष्ट करण्यात यावी, अशी विनंती सचिनने जैन यांना केली आहे.

‘बीसीसीआय’च्या घटनेतील ३८(३) कलमानुसार, ‘नियंत्रित श्रेणी’तील वाद हा वैयक्तिक स्तरावर हाताळण्याजोगा किंवा त्या व्यक्तीने हितसंबंधांची पूर्ण माहिती दिल्यास तोडगा निघणारा आहे, असेही सचिनने म्हटले आहे. लवाद अधिकाऱ्यांनी क्रिकेट सल्लागार समितीतील (सीएसी) तीन सदस्य सचिन, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना नोटीस पाठवली होती.

राहुल जोहरी यांनी जैन यांना पाठवलेल्या पत्रात हितसंबंधांचा मुद्दा हा घटनेतील ‘नियंत्रित श्रेणी’तील प्रकार असल्याचे म्हटले होते. त्या पाश्र्वभूमीवर सचिनने आपल्या पत्रात म्हटले आहे की, ‘‘मुंबई इंडियन्सचा ‘आयकॉन’ खेळाडू म्हणून माझी नियुक्ती २०१३ मध्ये झाली होती, तर ‘बीसीसीआय’ सल्लागार समितीपदी माझी नियुक्ती ही २०१५ साली केली होती. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी ‘बीसीसीआय’ची आहे. सल्लागार समितीमधील माझी भूमिका आणि आयपीएलसंबंधित फ्रेंचायझीकडून झालेली नियुक्ती यातून हितसंबंध जोपासले जाण्याची कोणतीही शक्यता नाही. या सर्व प्रकाराची माहिती ‘बीसीसीआय’ला आहे.’’

गेल्या दोन दशकांपासून अधिक काळ भारतीय क्रिकेटची सेवा करत असतानाही ‘बीसीसीआय’ अशा प्रकारची नोटीस पाठवल्यामुळे सचिन दुखावला गेला आहे. ‘‘भारतीय क्रिकेटच्या भल्यासाठी सल्लागार समितीचे सदस्यपद मी स्वीकारले; पण अशा प्रकारच्या नोटिशीला प्रत्युत्तर देणे, हे दुर्भाग्य आहे, असे मी समजतो. याप्रकरणी ‘बीसीसीआय’ दोषी असून त्यांनीच आता स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे,’’ असे सचिनने म्हटले आहे.