मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा एक शांत आणि संयमी फलंदाज होता. मैदानावरील गोष्टी आपल्या विरोधात गेल्या किंवा पंचांनी बाद नसतानाही बाद ठरवले, तरीदेखील सचिनने कधीही आपला राग किंवा रोष कधीही जाहीरपणे व्यक्त केला नाही. कारकिर्दीच्या सुरूवातीच्या काळात जलदगती गोलंदाजांना त्याने चोप दिला. सचिन तेंडुलकरकडे कमालीचे तंत्र होते. कव्हर्समधून फटकेबाजी करताना तो सहज चौकार मिळवायचा. वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजांची कायम फलंदाजांना दहशत असायची, पण वेस्ट इंडिजच्या एका माजी गोलंदाजाने सचिन तेंडुलरकरबाबत वक्तव्य केलं.

“माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मी अनेक फलंदाजांना गोलंदाजी केली, पण सचिनला गोलंदाजी करणं म्हणजे माझ्यासाठी सर्वात कठीण काम होतं. तो कायम सरळ रेषेत फटकेबाजी करायचा, त्यामुळे त्याच्याकडून चूक होण्याची शक्यता खूप कमी असायची”, असे क्रिकेट कनेक्टेड कार्यक्रमात वेस्ट इंडिजचे माजी वेगवान गोलंदाज इयन बिशप म्हणाले. सचिनने आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत ४६३ वन डे सामन्यात १८,४२६ धावा केल्या. तर २०० कसोटी सामन्यांमध्ये १५,९२१ धावा केल्या. १०० आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारा तो एकमेव खेळाडू आहे. त्याने कसोटीत ५१ तर वन डे मध्ये ४९ शतके लगावली.

सचिनला स्लेजिंग करण्याची हिंमत कोणतही नव्हती!

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अली याने सचिनबद्दल एक छान आठवण सांगितली होती. “मैदानावर असताना नयन मोंगिया बडबड करून फलंदाजाला खूप त्रास द्यायचा. तो असं काही बोलायचा, जे चारचौघात सांगता येणार नाही. अजय जाडेजादेखील खूप स्लेजिंग करायचा. तो आमच्या ड्रेसिंग रूममध्ये यायचा, तेव्हा तो आमचा खूप मार खायचा. इंझमाम, मी, रशिद लतीफ आणि वकार युनिस आम्ही त्याला खूप मारायचो. आम्ही सिद्धू आणि विनोद कांबळीला खूप चिडवायचो. पण सचिन आणि अझरूद्दीनला आम्ही कधीही डिवचलं नाही. त्यांच्याविरोधात स्लेजिंग करण्याची कोणाच्यातही हिंमत नव्हती”, असे बासित अली म्हणाला.

“सचिन अतिशय शांत होता, पण तरीही त्याचा खेळ आक्रमक होता. सचिनला जर मी डिवचण्याचा प्रयत्न केला असता, तर त्याने स्लेजिंगकडे लक्ष न देता खेळावर अधिक लक्ष केंद्रित केलं असतं. मला तरी सचिनबद्दल असं वाटतं. स्लेजिंगनंतर जेव्हा फलंदाज चिडचिड करतो, रागावतो; तेव्हा फलंदाज शक्य तितकी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळीच फलंदाजाला बाद करण्याची सर्वात जास्त संधी असते. पण सचिनच्या बाबतीत त्याचा काही उपयोग नव्हता”, असं पाकचा माजी कर्णधार वसीम अक्रमही म्हणाला होता.