जगभरात पसरलेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका BCCI सह बहुतांश क्रिकेट बोर्डांना बसला आहे. BCCI ने IPL 2020 स्पर्धा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केले आहे. गेल्या तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामनेही बंद आहेत. आता हळूहळू क्रिकेट पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे, पण करोनानंतरच्या क्रिकेट विश्वात काही नवे नियम लागू करण्यात आला आहे. क्रिकेटमध्ये चेंडूची चमक कायम राखण्यासाठी चेंडूवर थुंकी लावण्याची पद्धत जुनी आहे, मात्र अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पुढील काही काळ चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ किंवा थुंकीचा वापर करु नये, अशी सूचना केली आहे.

चेंडूच्या लकाकीसाठी थुंकी किंवा लाळ वापरू नये या ICC च्या नियमाच्या मुद्द्यावरून मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाची फिरकी घेतली. सचिनने आपल्या ट्विटरवर मलिंगाचा एक फोटो पोस्ट केला. त्या फोटोत मलिंगा चेंडूला किस करताना दिसत आहे. सामान्यपणे चेंडूला चकाकी आणण्यासाठी खेळाडू थुंकी किंवा लाळ चेंडूवर टाकून चेंडू पँटवर घासतात किंवा हाताने चमक आणतात. पण मलिंगा गोलंदाजी करण्यासाठी रन-अप घेताना चेंडूला किस करतो आणि चेंडू चमकवण्याचा प्रयत्न करतो. त्याच फोटोचा वापर करून सचिनने, ‘आता काही लोकांना आपला गोलंदाजीचा रन-अप बदलावा लागणार आहे. तुझं मत काय माली (मलिंगा)’, असं म्हणत त्याची खिल्ली उडवली. तसेच वाक्य संपल्यानंतर पुढे जीभ काढून वेडावण्याची इमोजीही वापरली.

दरम्यान, नव्या नियमानुसार गोलंदाजांना सामन्यादरम्यान चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ किंवा थुंकीचा वापर करण्याची मनाई आहे. एखाद्या खेळाडूने असं केल्यास पंच त्याला समज देऊ शकतात. एका संघाला पंच किमान दोन वेळा समज देऊ शकतात. परंतू एखाद्या खेळाडूकडून वारंवार हा प्रकार होत असेल तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला दंड म्हणून प्रतिस्पर्धी संघाला ५ धावा बहाल करण्यात येतील. तसेच थुंकीचा वापर झाल्यास चेंडू स्वच्छ करवून घेण्याची जबाबदारीही पंचावर राहणार आहे.