चायनीज तैपेई बॅडमिंटन स्पर्धा

चायनीज तैपेई बॅडमिंटन स्पर्धेला मंगळवारपासून प्रारंभ होणार असून सायना नेहवाल आणि सौरभ वर्मा पुन्हा अनुक्रमे महिला आणि पुरुष गटाचे विजेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक आहेत.

२००८मध्ये विजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या सायनाला यंदा अग्रमानांकन देण्यात आले आहे. याचप्रमाणे सौरभने २०१६मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चीनच्या लिन डॅनवर धक्कादायक विजय मिळवणाऱ्या एच. एस. प्रणॉयकडून भारताला विशेष आशा आहेत.

जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या सायनाने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दिमाखदार प्रारंभ केला. मात्र डेन्मार्कच्या मिआ ब्लिशफेल्डविरुद्धच्या सामन्यात पंचांच्या वादग्रस्त निर्णयांचा फटका तिला बसला. सायनाची पहिल्या फेरीत कोरियाच्या अ‍ॅन सी यंगशी गाठ पडणार आहे. या स्पर्धेत जेतेपदाची कडवी दावेदार असलेल्या सायनाला कॅनडाची द्वितीय मानांकित मिचेल लि, अमेरिकेची तिसरी मानांकित बेयवेन झँग आणि कोरियाची चौथी मानांकित संग जी ह्यून यांचे प्रमुख आव्हान असेल.

पुरुष एकेरीत हैदराबाद खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचा विजेता सौरभ कामगिरीतील सातत्य राखण्यासाठी उत्सुक आहे. त्याची पहिल्या फेरीत जपानच्या काझुमासा सकायशी गाठ पडणार आहे. प्रणॉयची सलामी वँग झु वेईशी होणार आहे. तिसऱ्या मानांकित समीर वर्माचा पहिला सामना मलेशियाच्या डॅरेन लीवशी होणार आहे.

महिला दुहेरीत अपर्णा बालन आणि प्राजक्ता सावंत भारतीय आव्हानाची धुरा सांभाळतील. त्यांची मलेशियाच्या सहाव्या मानांकित चोव मेई क्युआन आणि ली मेंग यीन जोडीशी पहिल्या फेरीत गाठ पडणार आहे.